३१ डिसेंबरसाठी - विद्यापीठ, महाविद्यालयातील प्रांगण ‘सुने-सुने’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:21 AM2020-12-30T04:21:45+5:302020-12-30T04:21:45+5:30
जळगाव : दरवर्षी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गजबजलेले महाविद्यालय, शाळा तसेच विद्यापीठ परिसर यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओस पडलेले पहायला मिळाले. डिसेंबर महिन्याला ...
जळगाव : दरवर्षी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गजबजलेले महाविद्यालय, शाळा तसेच विद्यापीठ परिसर यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओस पडलेले पहायला मिळाले.
डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली की, ओढ लागते ती स्रेहसंमेलांची...आविष्कार स्पर्धेची तर युवारंग महोत्सवाची...त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यापासूनच विद्यार्थ्यांच्या सरावाला सुरुवात व्हायची. पण, यावर्षी कोरोनाने अक्षरश: थैमान घातल्यामुळे मार्च महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद झाली आणि पाहता-पाहता विद्यार्थ्यांनी गजबलेले महाविद्यालय व शाळांमध्ये शुकशुकाट पहायला मिळाले. दोन ते तीन महिने तर परीक्षांचा गोंधळचं चालला. त्यात कोरोनाही कमी होण्याचे नाव घेईना. अखेर डिसेंबर महिन्यात होणारी जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा रद्द झाली. अन् भावी संशोधकांना आपले संशोधन सर्वांसमोर मांडण्याची संधीच मिळाली नाही.
आणि ती उमेदच राहिली नाही...
विद्यापीठातर्फे दरवर्षी युवारंग महात्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांकडून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. दोन वर्ष जिल्हास्तरावर झाल्यानंतर जानेवारी महिन्यात शहाद्यात केंद्रीयस्तरावर युवारंग महोत्सव पार पडला. विविध स्पर्धांमध्ये बाजी मारून स्पर्धेक सुवर्णपदक मिळवितात. यंदा नाही तर पुढील वर्षी नक्की बाजी मारू ही उमेद घेऊन अनेक स्पर्धक विद्यार्थी पुन्हा सरावाला लागतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवारंगाचे अद्यापही नियोजन नाही. त्यातच विद्यार्थी परीक्षांच्या गोंधळात व लॉकडाऊनमध्ये अडकल्यामुळे सरावही झाले नाही.
व्हॉट्स ॲप ग्रुपवर भरू लागली शाळा
शाळा, महाविद्यालय बंद झाली...पण विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद राहू नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाला सुरुवात झाली. शाळांमध्ये भरणारे वर्ग, व्हॉट्स अॅप ग्रुपवर भरू लागले. विद्यार्थ्यांना दिला जाणार अभ्यास हा पालक पाल्याकडून करून घेत होते. त्यामुळे वर्गांमध्ये भरणारी शाळा ही घरांमध्ये भरू लागली. दुसरीकडे गोरगरिबांकडे मोबाइल व ऑनलाइन सुविधा नसल्यामुळे त्यांच्या पाल्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित रहावे लागले. ही यंदाची गंभीर बाब ठरली.
विद्यार्थ्यांनी केले ‘इअर ड्रॉप’
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे शाळा, महाविद्यालय ही पुढील वर्षी उघडणार, अशा चर्चेला उधाण आले होते. त्यात शाळा, महाविद्यालय सुरू झाले तरी पाल्यांना पाठविण्यास पालकांना नकार होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी यंदा इअर ड्रॉप केले. तब्बल नऊ महिन्यानंतर इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा, महाविद्यालय सुरू झाली. आणि...दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांची पटसंख्या कमालीची वाढलेली पहायला मिळाली. पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबलेले प्रांगण बघायला मिळाले.