परराज्यांतून आलेले ३२ प्रवासी आढळले 'पॉझिटिव्ह'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:17 AM2021-05-11T04:17:02+5:302021-05-11T04:17:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रेल्वे स्टेशनवर परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत परराज्यांतून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेल्वे स्टेशनवर परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत परराज्यांतून आलेले ३२ प्रवासी कोरोना 'पॉझिटिव्ह' आढळून आले आहेत, तर ७४४ प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राम रावलानी यांनी दिली.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे केरळ, गोवा, राजस्थान, दिल्ली व उत्तराखंड या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची अँटिजन चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून जळगाव रेल्वे स्टेशनवर मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकातर्फे परराज्यांतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळच हे पथक तैनात करण्यात आले आहे. प्रत्येक प्रवाशाची या ठिकाणी नोंद करण्यात येत आहे. अँटिजन चाचणी केल्यानंतर त्या प्रवाशाला त्या ठिकाणीच थांबवून दहा ते पंधरा मिनिटांत अँटिजन चाचणीचा रिपोर्ट देण्यात येत आहे.
इन्फो :
आतापर्यंत ३२ प्रवासी आढळले पॉझिटिव्ह
मनपाच्या वैद्यकीय पथकातर्फे परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची अँटिजन चाचणी करण्यात येत असून, आतापर्यंत ७७६ प्रवाशांची अँटिजन चाचणी करण्यात आली आहे. त्यात आतापर्यंत ३२ प्रवासी पॉझिटिव्ह आले आहेत, तर ७४४ प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य पथकातर्फे प्रवाशांना मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे.