अजिंठा घाटात अपघातामुळे जळगाव जिल्ह्यातील 33 एसटी बसेस् अडकल्या
By admin | Published: May 6, 2017 05:00 PM2017-05-06T17:00:13+5:302017-05-06T17:00:13+5:30
या बसना मागे जाऊन मार्ग बदलणे शक्य नसल्याने त्या सहा तास तशाच अडकून होत्या.
ऑनलाइन लोकमत
जळगाव : अजिंठा घाटात दोन ट्रकचा अपघात झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन जळगावकडे येणा:या व जळगावसह इतर आगारांमधून औरंगाबाद, पुणेकडे जाणा:या 33 एसटी बस अडकल्या. या बसना मागे जाऊन मार्ग बदलणे शक्य नसल्याने त्या सहा तास तशाच अडकून होत्या. यामुळे जिल्हा प्रशासनाचे आदेश घेऊन जिल्ह्यातील एसटीच्या आगारांमधून सुटणा:या 25 एसटी बस सोयगावमार्गे घाटनांद्रा घाटातून वळविण्यात आल्या. त्यात जवळपास 960 प्रवाशांना जादा भाडे द्यावे लागले. एक कि.मी.मागे एक रुपया अधिक अशा स्वरुपात भाडे आकारण्यात आले. फर्दापूर येथे स्वतंत्र कक्षाद्वारे त्यासंबंधीच्या सूचना वाहकांना देण्यात आल्या.
पहाटे अजिंठा घाटात अपघात घडल्यानंतर त्याची माहिती लागलीच एसटीच्या विभागीय कार्यालयास न मिळाल्याने काही बस फर्दापूरमार्गे पुढे घाटाकडे गेल्या. त्या जशा पुढे गेल्या तशा मागे येणे शक्य नव्हते. त्यामुळे यावल आगारातील सहा, जळगाव आगारातील सहा, जामनेर आगारातील सहा, मुक्ताईनगर आगारातील एक व भुसावळ आगारातील सहा एसटी बस अडकल्या. या बसमागेही मोठी वाहतूक कोंडी झाली.
पर्यवेक्षकांना फर्दापूरकडे तातडीने पाठविले
अजिंठा घाटात वाहतुकीची कोंडी झाल्याने सकाळी 7 वाजताच एसटीच्या वरिष्ठ कार्यालयाने एका विशेष वाहनाद्वारे पर्यवेक्षक व अधिका:यांना पाठविले. ज्या बस रस्त्यात जाताना दिसल्या त्यांना घाटनांद्रा घाटातून जाण्याच्या सूचना दिल्या. जवळपास 25 बस सोयगावमार्गे घाटनांद्रा घाटातून पाठविण्यात आल्या. यातील 960 प्रवाशांना जादा भाडे द्यावे लागल्याची माहिती मिळाली.
सकाळी सहा व सातदरम्यान निघालेल्या 20 बस अडकल्या
सकाळी सहा व सात यादरम्यान औरंगाबाद व पुणेकडे यावल, जळगाव, जामनेर, भुसावळ या आगारांमधून निघालेल्या 20 एसटी बस अजिंठा घाटातील कोंडीत अडकल्या. त्यांच्यामागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने त्यातील प्रवाशांसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था लागलीच करणे शक्य झाले नाही. अशा जवळपास 700 प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागला.
येणा:या 13 बस अडकल्या
जळगावकडे औरंगाबाद, पुणे, बुलडाणा, सिल्लोड, अकोला आदी ठाकाणाहून येणा:या जवळपास 13 बस घाटात अडकल्या. त्या बसचा मार्ग लागलीच बदलणे शक्य झाले नाही. या बसमध्येही जवळपास 500 प्रवासी होते.
सकाळी 10 वाजता वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती
एसटीच्या विभागीय कार्यालयास सकाळी 10 वाजता वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती देण्यात आली. पण 11 वाजेनंतर वाहतुकीची कोंडी दूर झाली.