एकाच रात्री जिल्ह्यात पकडले ३३५ गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:11 AM2019-02-10T11:11:40+5:302019-02-10T11:11:59+5:30
रात्री १० ते पहाटे ६ पर्यंत चालली गुन्हेगारांच्या घराची झडती
जळगाव : पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी रात्री संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी आॅपरेशन आॅल आऊट मोहीम राबविली. त्यात कोम्बींंग आॅपरेशनमध्ये ३३५ गुन्हेगार व संशयित आरोपींना पकडण्यात आले. जिल्ह्यात पहिल्यांदाच असे आॅपरेशन राबवून इतक्या मोठ्या प्रमाणात आरोपींना पकडण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यातील सर्व जण पोलिसांच्या रेकॉर्डवर तसेच काही जण फरार गुन्हेगार आहेत.
या मोहीमेमुळे रात्रभर संपर्ण शहरात रस्त्यावर पोलीस दिसत होते. यावेळी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदीमध्ये ४८२ जणांवर कारवाई करण्यात आली, त्यांच्याकडून ९५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
अचानक राबविलेल्या या कोम्बींग आॅपरेशनमुळे शहरात नेमके काय झाले, हे कोणालाच कळत नव्हते. काही तरी घटना घडल्याची चर्चा रात्रभर होती.
एमआयडीसी हद्दीत किरण खर्चेसह ४१ आरोपी पकडले
शुक्रवारी रात्री १० ते शनिवारी पहाटे सहा या वेळेत एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेकॉर्डवरील ९४ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४१ गुन्हेगारांनी अटक करण्यात आली. या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर २१५ गुन्हेगार आहेत. हद्दपार असलेल्या किरण शंकर खर्चे (वय २७, रा. सुप्रीम कॉलनी) या सराईत गुन्हेगारालाही अटक झालेली आहे.
दोन वर्षासाठी हद्दपार असतानाही तो घरी होता. किरण खर्चे याच्याविरुध्द हाणामारी, दंगल, शस्त्र बाळगणे यासारखे १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. कॉ.किशोर राजाराम पाटील यांच्या फिर्यादीवरुन खर्चे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार आनंदसिंग पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८ जणांवर कारवाई
याच कोम्बींग दरम्यान नाकाबंदी राबविण्यात आली. त्या दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी विना हेल्मेट, मद्य प्राशन करुन वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे यासह इतर नियमांचे उल्लंघन करणाºया १८ जणांविरुध्द कारवाई करण्यात आला.
वॉरंटमधील ८ जणांना अटक
न्यायालयाने बजावलेल्या वारंटमध्ये फरार असलेल्या ८ जणांनाही याच कोम्बीग आॅपरेशनमध्ये अटक करण्यात आली. त्यात सुनील मदन साखला (प्लॉट क्र.४८,हाऊसिंग सोसायटी, जळगाव), मोहम्मद भिकन खाटीक (रा.बिलाल चौक, तांबापुरा), टारझन अरुण दहेकर (रा.जाखनी नगर), सादीक शेख अय्युब (रा.तांबापुरा), शेख कदीर शेख कबीर (रा.उपासनी नगर, मेहरुण) यांचा समावेश आहे.
आकाश अनिल बागडे व बळीराम उखडू सोनवणे या दोघांनी न्यायालयातून वारंट रद्द केल्याची पुरावा पोलिसांकडे सादर केला.
पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे पहाटेपर्यंत रस्त्यावर
४या कोम्बीग दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे हे स्वत: पहाटे पाच वाजेपर्यंत रस्त्यावर होते. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत जावून त्यांनी कोम्बीगची माहिती घेतली. भुसावळ, यावल, अडावद, चोपडा, धरणगाव येथे स्वत: ते सहभागी झाले होते. पथकाला रस्त्यावरच गाठून किती गुन्हेगार तपासले, किती मिळाले याची माहिती ते घेत होते.भजे गल्लीतील हॉटेलमध्ये जावून त्यांनी तपासणी केली तसेच उशिरापर्यंत हॉटेल सुरु न ठेवण्याची तंबी हॉटेल चालकांना दिली.
४ शिंदे स्वत: रस्त्यावर असल्याने अधिकारी व कर्मचारी जातीने आॅपरेशन राबवित होते. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, गुन्हे शोध पथक, शीघ्र कृती दल व राखीव पोलीस दलाचे जवान या आॅपरेशनमध्ये सहभागी झालेले होते. चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनीही त्यांच्या परिमंडळात कोम्बीगदरम्यान भेटी दिल्या. तेदेखील पहाटेपर्यंत मोहीमेत सहभागी झाले होते.