खान्देशातील ३५ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३४ कोटींची भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 17:12 IST2023-04-11T17:12:21+5:302023-04-11T17:12:51+5:30
मार्च महिन्यात ८ दिवस वादळासह अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे नुकसान झाले होते.

खान्देशातील ३५ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३४ कोटींची भरपाई
जळगाव : मार्च महिन्यात राज्यात झालेल्या वादळासह अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या३५ हजार ९१७ शेतकऱ्यांसाठी ३४ कोटी ८८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यात २० कोटी ४२ लाख जळगावसाठी, ८ कोटी १३ लाख नंदुरबार तर ६ कोटी ७५ लाखांचा निधी धुळे जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे.
मार्च महिन्यात ८ दिवस वादळासह अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे नुकसान झाले होते. त्याचा फटका खान्देशातील ३५ हजारांवर शेतकऱ्यांना बसला होता. तशातच सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने त्यावेळी पंचनाम्यांचे कामही रखडले होते. संप मागे घेताच प्रशासनाने पंचनाम्यांना सुरुवात केली आणि त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. राज्यातील अमरावती, नाशिक, पुणे व औरंगाबाद विभागाकडून अहवाल प्राप्त होताच राज्य शासनाने दि.१० एप्रिल रोजी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरपाईला मंजुरी दिली आहे.
मदतीची प्रक्रिया सुरू
सोमवारी जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात राज़्य शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मंगळवारी तालुकानिहाय शेतकऱ्यांची निश्चिती करुन त्यांच्या बॅंक खात्याचा डाटा अपडेट करण्याचे काम सुरु केले आहे. येत्या पंधरवाड्यात संपूर्ण नुकसानग्रस्तांच्या बॅंक खात्यावर नुकसान भरपाईची रकम टाकली जाईल, यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.
जिल्हानिहाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा तपशील
जिल्हा- शेतकरी- बाधित क्षेत्र (हेक्टर)- निधी (लाखात)
जळगाव- १८३६३- ११९९१- २०४२.६१
धुळे- ८७१७- ३९४४.०२- ६७५.९८
नंदुरबार- ८८३६- ४७३०.०४- ८१३.२३