पारोळा तालुक्यात ३४ गावांना भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:21 PM2018-06-12T17:21:58+5:302018-06-12T17:21:58+5:30

२३ गावांना टँकरने तर १० गावांना विहीर अधिग्रहण

34 villages in Parola taluka have severe water shortage | पारोळा तालुक्यात ३४ गावांना भीषण पाणीटंचाई

पारोळा तालुक्यात ३४ गावांना भीषण पाणीटंचाई

Next
ठळक मुद्देडिझेलअभावी टँकर होते बंदगटविकास अधिकारी म्हणतात, पाणीटंचाईवर लक्ष ठेवूनवेळेवर पाऊस न झाल्यास टंचाई वाढणार


लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : तालुक्यात एकूण ३४ गावांना भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येत्या तीन-चार दिवसात पावसाचे आगमन न झाल्यास अनेक गावांमध्ये पाणीटंचाई समस्या उग्र रूप धारण करेल आणि टंचाई गावांच्या संख्येत वाढ होईल, अशी परिस्थिती आहे.
आजच्या स्थितीत एकूण ३३ गावांना पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. यात २३ गावांना पाच शासकीय टँकरने आणि उर्वरित ११ गावांना खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
या गावांना सुरू आहे टँकरने पाणीपुरवठा
खेडीढोक, मेहू, टेहू, मंगरुळ, वाघरा, वाघरी, सांगवी, पिंपळ भैरव, बाभलेनाग, खोलसर, मोहाडी, पोपटनगर, मोरफळ, हनुमंतखेडे, भोंडण, कंकराज, जिराळी, भोलाणे, वसंतनगर, रामनगर, देवगाव,धाबे, सबगव्हाण या २३ गावांना शासकीय पाच टँकरने बोरी धरणातून भरून त्या त्या गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत टाकण्यात येतात.
या गावांना झाले विहीर अधिग्रहण
वडगाव, अंबापिंप्री, शेळावे, राजवड, लोणी, महालपूर, विटनेर, हिरापूर, भिलाली, वंजारी, पळासखेडे सिम या ११ गावात गावातील खासगी विहीर अधिग्रहित करण्यात आले आहे.
या खेडीढोक, मेहू, मंगरुळ, वाघरे या गावांना दररोज तीन खेपा तर भोंडण गावाला चार खेपा ग्रामपंचायतीच्या विहिरीत टाकण्यात येतात. गावात टँकर आल्यावर ग्रामस्थ पाणी घेण्यासाठी एकाच गर्दी करतात. विहिरीतून तोलून पाणी काढताना ग्रामस्थांची एकाच दमछाक होते. अनेक गावांना टँकरने होणारा पाणीपुरवठा हा कमी पडत असल्याने शेतातून बैलगाडी सायकलने पाण्याचे ड्रम भरून आणावे लागतात. या आठवडेभरात पावसाचे आगमन न झाल्यास पाणीटंचाई समस्या उग्ररूप धारण करेल. कारण तालुक्यात एकमेव बोरी धरणातून टँकरने पाणी उपसा सुरू आहे. या बोरी धरणातही मृत पाणी साठा शिल्लक आहे. असाच उपसा या बोरीतून सुरू राहिला तर शहराला पाणीटंचाईच्या झळा बसतील यात शंका नाही
डिझेलअभावी टँकर होते बंद
पाणीटंचाईची समस्या असलेल्या गावात शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावातील राजाराम पाटील यांच्या पेट्रोल पंपावरून डिझेल टाकले जात होते. पण डिझेलची थकबाकी थकल्याने टँकरला डिझेल देणे पंपमालकाने बंद केले. डिझेलअभावी पाणीपुरवठा बंद झाला होता. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून डिझेल निधी न आल्याने टँकर जागेवर थांबले होते. मग ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अधिकारी नलवाडे यांनी बिलाची जबाबदारी स्वीकारली आणि पुन्हा मग टँकरला डिझेल देणे सुरू केले आणि या भागात टँकरने पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.


तालुक्यात पाणीटंचाई समस्या गंभीर आहे. वेळेवर पावसाचे आगमन झाले नाही तर पाणीटंचाई समस्या उग्ररूप धारण करेल. तरीही मागणीप्रमाणे त्या गावात टँकरने व विहीर अधिग्रहित करून पाणीटंचाई समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाणीटंचाई समस्येवर लक्ष ठेवून आहे.
-आर.के.गिरासे, गटविकास अधिकारी, पारोळा




 

Web Title: 34 villages in Parola taluka have severe water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.