रविवारी ३४२० विद्यार्थी देणार एम-सेट परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 09:19 PM2020-12-23T21:19:43+5:302020-12-23T21:20:02+5:30
आठ केंद्र : प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध
जळगाव : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाद्वारे जळगाव केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या ३६व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय चाचणी (एम-सेट) परीक्षा रविवारी जळगाव शहरातील आठ केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.
एम-सेट परीक्षेसाठी तीन हजार ४२० विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यावर दिलेल्या सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सेट परीक्षेचा अर्ज भरताना वापरलेला लॉगिन आयडी व पासवर्डचा उपयोग करावयाचा आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करताना काही अडचणी आल्यास विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
असे आहेत परीक्षा केंद्र
मुळजी जेठा महाविद्यालयाच्या परिसरातील केंद्र संकेतांक क्रमांक १४०१- स्वामी विवेकांनद भवन-अ, केंद्र संकेतांक क्र.१४०२- स्वामी विवेकांनद भवन-ब, केंद्र संकेतांक क्रमांक १४०३-केसीईचे शिक्षणशास्र महाविद्यालय, केंद्र संकेतांक क्रमांक १४०४- केसीइचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च सेंटर, केंद्र संकेतांक क्रमांक १४०५ - केसीईचे अभियांत्रिकी महाविद्यालय, केंद्र संकेतांक क्रमांक १४०६- अॅड. सीताराम (बबनभाऊ) आनंदरामजी बाहेती महाविद्यालय, केंद्र संकेतांक क्रमांक १४०७ पी.एन. लुंकड कन्या शाळा व केंद्र संकेतांक क्रमांक १४०८ ओरियन सीबीएसई स्कूल अशा एकूण आठ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.