४५ पतसंस्थांमध्ये ३५२ कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:30 AM2019-02-04T11:30:21+5:302019-02-04T11:31:45+5:30

जळगाव  जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण

35 crores scam in 45 credit societies | ४५ पतसंस्थांमध्ये ३५२ कोटींचा घोटाळा

४५ पतसंस्थांमध्ये ३५२ कोटींचा घोटाळा

googlenewsNext
ठळक मुद्दे ९०७ जणांविरुद्ध गुन्हे



जळगाव : जिल्ह्यात ४५ पतसंस्थांमध्ये तब्बल ३५२ कोटींचा घोटाळा झाला असून याप्रकरणी आतापर्यंत ९०७ जणांवर सहकार विभागातर्फे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. संपूर्ण राज्यात जळगाव जिल्ह्यात हे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातील ६५० पतसंस्थांपैकी तब्बल १७८ पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. त्यात विनातारण कर्ज, अनियमितता, गैरव्यवहार आदी कारणांमुळे काही पतसंस्थांची अवस्था अत्यंत बिकट झाली. त्यामुळे ४५ पतसंस्थांमधील ३५१ कोटी ८८ लाखांच्या रक्कमेच्या वसुलीसाठी तब्बल ९०७ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहकार विभागाने २०१६-१७ ते २०१८-१९ या आर्थिक वर्षात अडचणीतील पतसंस्थांच्या एकूण २५६६ कर्जदारांकडून २४ कोटी ७४ लाखांची वसुली केली. तसेच याच कालावधीत अडचणीतील पतसंस्थांच्या एकूण १३५६४ ठेवीदारांना २३ कोटी ९३ लाख रक्कमेच्या ठेवींचे वाटप करण्यात आले. मात्र अडकलेल्या ठेवींच्या तुलनेत हे प्रमाण अल्प आहे. एकूण अडचणीतील १७८ पतसंस्थांपैकी ७४ पतसंस्था अडचणीतून बाहेर पडलेल्या आहेत. तर १०४ पतसंस्था अजूनही अडचणीत आहेत.
पतपेढ्यांमधील घोळाबाबत तक्रारी आल्यानंतर त्यांची सहकार कायद्यानुसार चौकशी करणे, मोठ्या कर्जदारांकडून वसुली करणे व वसुली न झाल्यास गुन्हे दाखल करणे, यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. काही प्रमाणात त्यात तथ्य असले तरीही सहकार विभाग व पतसंस्थांचे संचालक यांच्यात हातमिळवणी होत असल्यानेच कठोर कारवाई होत नसल्याचे आरोप ठेवीदारांकडून होत आहेत.

पतसंस्थांमधील घोळ उघडकीस आल्याचे प्रकार घडल्यानंतर प्रशासन सतर्क असून नव्याने काही तक्रार आली तर लगेच टेस्ट आॅडीट केले जाते. मात्र नंतर असे प्रकार झालेले नाहीत. काही पतसंस्था चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत.
-एम.यु.राठोड, जिल्हा उपनिबंधक, जळगाव.

Web Title: 35 crores scam in 45 credit societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.