मनपातील ३५ कर्मचारी होणार आज सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:12 AM2021-05-31T04:12:36+5:302021-05-31T04:12:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून राज्य शासनाच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात बोझा पडला आहे. त्यामुळे यंदा कोणतीही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून राज्य शासनाच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात बोझा पडला आहे. त्यामुळे यंदा कोणतीही नोकरभरती होणे कठीण आहे. त्यात महानगरपालिकेत येत्या काही महिन्यात कर्मचा-यांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण आधीच महापालिकेतील ९०० जागा रिक्त आहेत. त्यातच या वर्षात ३०० हून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. ३१ मे रोजी मनपात एकूण ३५ कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यातच जुलै अखेर मनपातील १०० हून अधिक कर्मचारी सेवा निवृत्त होणार असल्याने कर्मचा-यांविना मनपाच्या कामकाजावर मोठा परिणाम होऊन याचा परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या सोयी- सुविधांवरदेखील होण्याची शक्यता आहे.
लॉकडाउनमुळे राज्यातील सर्वच उद्योग धंदे बंद होते. त्यातच राज्याला मिळणारा महसुलात मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत नवीन भरती प्रक्रिया घेतली तर राज्याचा तिजोरीवर बोझा पडणार आहे. यामुळे शासनाने नवीन भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. याचा फटका महापालिकेला अधिक बसणार आहे. कारण मनपात याआधीच ९०० जागा रिक्त आहेत. मनपातील अनेक विभागात एकाच कर्मचा-याला विविध अतिरिक्त पदे देण्यात आली आहेत. अतिरिक्त पदांमुळे एकाच विभागावर कर्मचारी लक्ष केंद्रित काम करू शकत नाहीत. यामुळे मनपातील कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो.
३०-४० वर्ष सेवा बजावणारे अधिकारीही निवृत्त
शहरातील समस्यांसह नागरिकांच्या गरजा समजणारे मनपातील जुनेजाणते अधिकारीदेखील आता सेवानिवृत्त झाल्यामुळे मनपाचा कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. भोळे, खडके, खान, मराठे, साळुंखे यांच्यासारखे अधिकारीदेखील गेल्या वर्षीच सेवानिवृत्त झाले होते. त्यात आता उर्वरित अधिकारीदेखील आता सेवानिवृत्त होत असल्याने मनपाच्या इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची पदेही रिक्त
महापालिकेत अप्पर आयुक्त पद, १ उपायुक्त, २ साहाय्यक उपायुक्त, नगरसचिव, वाहन विभाग प्रमुख अशी अनेक महत्त्वाची पदे रिक्त महापालिकेतील कर्मचा-यांना पदभार देऊन प्रभारी कारभारी करून काम रेटून नेले जात असल्याचे चित्र सध्या आहे. वारंवार पत्रे पाठवून देखील शासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने पदाधिकारी व प्रशासन हैराण झाले आहे.
अनुकंपाधारकांनाही न्याय नाही, कंत्राटी भरती ही नाही
महापालिकेत सद्यस्थितीत ९०० हून अधिक जागा रिक्त आहेत. महापालिकेच्या आकृतिबंध अजूनही मंजूर झालेला नाही. अशा परिस्थितीत रिक्त जागा भरण्यासाठी महासभेत कंत्राटी पद्धतीने जागा भरण्याचा ठराव देखील काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. मात्र हा ठराव करून पाच महिन्यांच्या वर काय झाला असून, ठरावाची अंमलबजावणी अजूनही करण्यात आलेली नाही. तसेच अनेक अनुकंपाधारक न्यायाच्या प्रतीक्षेत असून, आंदोलने करून देखील या अनुकंपाधारकांना महापालिकेत समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. जागा रिक्त असताना देखील महापालिका प्रशासनाकडून अनुकंपाधारकांना न्याय दिला जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
-मनपात सध्या काम करत असलेले कर्मचारी - १७००
-मनपाला लागणारे एकूण कर्मचारी संख्या - २७७४
- रिक्त पदे - ९००
- जुलै २०२१ पर्यंत सेवानिवृत्त होणारे कर्मचारी - १००