३५ वर्षांत शहरातील ६० टक्के रस्ते झालेलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:13+5:302021-03-21T04:16:13+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या ३५ वर्षांत जळगाव शहरातील वाढीव उपनगरातील ६० टक्के रस्ते झालेलेच नसून, ही माहिती ...

In 35 years, 60% of the roads in the city have not been completed | ३५ वर्षांत शहरातील ६० टक्के रस्ते झालेलेच नाहीत

३५ वर्षांत शहरातील ६० टक्के रस्ते झालेलेच नाहीत

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या ३५ वर्षांत जळगाव शहरातील वाढीव उपनगरातील ६० टक्के रस्ते झालेलेच नसून, ही माहिती तुम्ही माहिती अधिकारात घेऊ शकता, असा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला आहे. ज्या ४० टक्के रस्त्यांचे काम झाले, त्यापैकी २० टक्के रस्ते खराब झाल्याचे त्यांनी मान्य केले. अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यावर रस्त्याचे काम करता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. जळगाव महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर आमदार भोळे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर आरोपाच्या फैरी झाडल्या. ही अभद्र युती असून, भाजपमधून फुटलेल्या ‘त्या’ नगरसेवकांनी नैतिकता असेल, तर राजीनामा देऊन पुन्हा जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

आमदार भोळे म्हणाले की, आम्ही फोडाफोडीचे राजकारण केले नाही. आम्ही निवडणूक लढून जनतेतून नगरसेवक निवडून आणले. मात्र, भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. त्यांना पक्ष शिस्त, संघटना त्यांना माहीत नव्हती, चौकटीत काम त्यांना करायचे नव्हते, म्हणून ते गेले असतील, असा टोलाही भोळेंनी लगावला. भाजपची राज्यात सत्ता असताना शिवाजीनगर पूल पिंप्राळा उड्डाणपुलाच्या कामासाठी ९५ कोटींचा निधी मंजूर केला. केंद्र सरकारकडे बैठका घेऊन ४५० कोटींचे कर्ज २५० कोटींचे केले. त्यातही १२५ कोटी माफ करून १२५ कोटी बिनव्याजाने दिले. हे कर्ज माफ झाल्यामुळेच आम्ही गेल्या सभेत ७० कोटींचे रस्ते मंजूर केले असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. दरम्यान, मागासवर्गीयांना पदांपासून दूर ठेवल्याचा आरोप सुरेश सोनवणे यांनी केला आहे. कुलभूषण पाटील यांनी आमदार निधीतील कामांचे श्रेय घेतले. भाजपने सर्व समाजाला न्याय दिल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सोडून गेलेल्या २७ नगरसेवकांना आम्ही विविध पदे दिली होती, निधी दिला होता, तरीही ते गेल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.

नगरसेवकांमध्येच कामांवरून होते मतभेद

१९ प्रभागांसाठी प्रत्येकी दहा लाख दिल्यानंतर या प्रभागात ठोस काम व्हावे, अशी आमची अपेक्षा असायची. मात्र, तसे न करता अडीच-अडीच लाख रुपये आम्हाला द्या, आम्ही कामे करू, असे मतभेद नगरसेवकांमध्ये होते, असे आमदार भोळे यांनी स्पष्ट केले.

...अन् महात्मा फुलेंचे उदाहरण

मोठ्या संख्येने नगरसेवक का सोडून गेले, या प्रश्नावर आमदार भोळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा एक प्रसंग सांगितला. महात्मा फुले यांना एकदा चोरांनी गाठले होते, त्यावेळी माझा जीव घेऊन तुमचे भले होत असेल, तर मला मान्य आहे. हे ऐकून चाेरांची शस्त्रे गळाली होती. इथे मात्र, तसे नाही. आमचे नाव घेऊन, आमच्यावर आरोप करून ते सत्तेत आले आहेत. मात्र, भाजपने कधीच सत्तेसाठी लाचारी पत्करली नाही, असे आमदार भोळे यावेळी म्हणाले.

आम्ही दुसऱ्या तर ते सतराव्या मजल्यावर

नागरिकांना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणे, त्यांची भेट घेणे सोयीचे व्हावे, लिफ्टचा वापर कमी होऊन विजेची बचत व्हावी, यासाठी आमचे पदाधिकारी हे दुसऱ्या मजल्यावर उपस्थित असायचे. मात्र, यांची सत्ता येताच, हे सतराव्या मजल्यावर गेेले. दोनच दिवसांत हा प्रकार जनतेसमोर असल्याचे भोळे म्हणाले.

बोलविता धनी दुसरा

जळगावच्या महापालिकेत थेट मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री लक्ष घालतात. त्यामुळे यात वरिष्ठांचा रस होता. हा विषय केवळ माझ्यापुरता मर्यादित नाही, हाही विचार व्हावा, यांचा बोलवता धनी दुसराच असून, ठरवून केलेले हे काम आहे. आपले झाकून दुसऱ्यांकडे बोट दाखवून बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोपही भोळेंनी केला आहे.

नगररचना विभागाच्या भ्रष्टाचारावर आता नजर

नगररचना विभागात अधिकारी व पदाधिकाऱ्यांची मिलीभगत सुरू असून, यात भ्रष्टाचाराचा आमदार भोळे यांनी आरोप केला आहे. यावर लक्ष ठेवून याबाबत आता जाब विचारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमची सत्ता असतानाही आम्ही आयुक्तांकडे हा विषय वारंवार मांडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक बेकायदेशीर, याचिका दाखल करणार

ही निवडणूक प्रक्रिया पूर्णत: बेकायदेशीर असून, याबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ॲड.शुचिता हाडा यांनी सांगितले. अर्जावरील स्वाक्षऱ्यांची पडताळणी नसणे, ऑनलाइन सभेला ९४ जण कसे, सरिता माळी, सत्यजीत पाटील हे कसे सभेत सहभागी झाले, असे प्रश्न ॲड.हाडा यांनी उपस्थित केले असून, ऑनलाइन सभेत अनेकांचे चेहरे दिसत नव्हते, अनेकांनी चुकीची नावे घेतली, अनेकांचे माइक, बंद होते, याच्या तक्रारी करूनही आमची दखल घेतली गेली नाही, प्रशासन दबावात काम करीत होते, असा आरोप त्यांनी केला आहे. पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत दोन तृतीयांशपेक्षा कमी नगरसेवक गेल्याने ते अपात्र होतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

Web Title: In 35 years, 60% of the roads in the city have not been completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.