३५ हजार मुलांना जावे लागणार बँकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:45+5:302021-06-30T04:11:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : सुट्टी कालावधीतील पोषण आहार वितरणाऐवजी त्या विद्यार्थ्यांच्या नावे बँकेत रक्कम जमा करण्याचा विचार ...

35,000 children will have to go to the bank | ३५ हजार मुलांना जावे लागणार बँकेत

३५ हजार मुलांना जावे लागणार बँकेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : सुट्टी कालावधीतील पोषण आहार वितरणाऐवजी त्या विद्यार्थ्यांच्या नावे बँकेत रक्कम जमा करण्याचा विचार शासनाने केला आहे. कोविड १९च्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने शाळा बंद असल्या, तरी शासनाच्याच आदेशामुळे तालुक्यातील ३५ हजार १९३ विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी जावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे गोंधळणारे आदेश काढण्यात येत असल्याने शिक्षकांसह पालक मुलांच्या संसर्गाच्या भीतीने चिंतेत पडले आहेत.

तिसऱ्या लाटेची भीती आणि त्यातल्या त्यात लहान मुलांना अधिक धोका असल्याने शासनाने किमान १५ ऑगस्टपर्यंत शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गेल्या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सुट्टी कालावधीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेला नाही. त्याऐवजी विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याचा शासन विचार करीत असून, राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी २५ जून रोजी आदेश काढून सर्व शालेय पोषण आहारास पात्र लाभार्थ्यांचे १०० टक्के बँक खाते उघडून, त्याची माहिती ९ जुलैपर्यंत जिल्हास्तरावर जतन करून ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.

फक्त अमळनेर तालुक्याचा विचार केल्यास तालुक्यात पहिली ते आठवीपर्यंत पोषण आहारासाठी पात्र ३५ हजार १९३ विद्यार्थी आहेत. १ ली - अद्याप प्रवेश नाही

१ ली- ४,०१७ २ री - ४,१९० ३ री- ४,४२७ ४ थी- ४,५६४ ५ वी- ४,६७८ ६ वी- ४,५२५ ७ वी- ४,४३९ ८ वी- ४,३५३

अशी विद्यार्थी संख्या आहे

सध्या डेल्टा प्लस, तसेच कोरोनाच्या भीतीने बँकांमध्ये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने काम सुरू आहे. त्यामुळे बँक कर्मचारी नवीन खाते उघडण्यास टाळाटाळ करतात. फक्त शिष्यवृत्ती घेणाऱ्या मागासवर्गीय मुलांची किंवा त्यांच्या पालकांच्या नावाची खाती उघडली आहेत. मात्र, या आदेशात मुलांचीच खाती उघडायची असल्याने अडचणी जास्त आहेत. त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांची खाती विना डिपॉझिट काढावी लागतात. त्यामुळे त्यांचा नकार मिळतो. त्याचप्रमाणे, खाते क्रमांक किमान ८ ते १० दिवस मिळत नाही. शेतीचे दिवस, पालक कामात व्यस्त असल्याने खाती उघडणे अवघड बाब आहे. शासनाने विद्यार्थ्यांनुसार रक्कम शाळेला देऊन ती जबाबदारी शाळेवर दिल्यास सोयीनुसार वाटप करता येणार आहे.

----

मुलांच्या नावाने खाते उघडायचे, म्हणजे मुलांना बँकेत न्यावे लागेल, त्यामुळे संसर्गाचा धोका आहेच, शासन असे विचित्र निर्णय कसे घेते, त्यापेक्षा शाळा सुरू कराव्यात. - अनिल पाटील, पालक, मंगरुळ

----

सुट्टी कालावधीतील शालेय पोषण आहार साधारणतः दीड महिन्याचा असेल, म्हणजे १ ली ते ५ वीपर्यंत १७९ रुपयांचा तर ६ वी ते ८ वीपर्यंत २६८ रुपयांचा पोषण आहार मिळेल. मात्र, खाती उघडण्यास किमान १०० रुपये लागतील, तर पालकांना परवडेल कसे?

- प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष मुख्याध्यापक संघटना, अमळनेर

----

शिक्षक १०वीच्या निकालात व्यस्त आहे, खाती उघडण्याची जबाबदारी वर्गशिक्षकवर आल्याने, अनेकदा गरीब मजुरांच्या मुलांना बँकेत घेऊन जाण्याची जबाबदारी शिक्षकावर येते संसर्ग झाल्यास जबाबदार कोण?

- आर.जे. पाटील, जिल्हा कार्यध्यक्ष, शिक्षक भारती संघटना ----

जळगाव

शासनाच्या किंवा वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे, योग्य ती काळजी घेऊन प्रक्रिया मुदतीत पूर्ण करावी.

- आर.डी. महाजन, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती अमळनेर

Web Title: 35,000 children will have to go to the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.