जळगावात तीन दिवसांत ३७ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:15 AM2021-04-18T04:15:17+5:302021-04-18T04:15:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविडपेक्षा सारीने अधिक मृत्यू होत असल्याचे सांगितले जात असतानाच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडपेक्षा सारीने अधिक मृत्यू होत असल्याचे सांगितले जात असतानाच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत ३७ मृत्यूची नोंद असून, यापैकी केवळ १५ बाधित असून, उर्वरित २२ मृत्यू हे संशयित रुग्णांचे झाले आहेत. यात या रुग्णांचा सारीने मृत्यू झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मृतांची आकडेवारी प्रचंड वाढली आहे. प्रत्यक्षात बाधितांचे होणारे मृत्यू व होणारे अंत्यसंस्कार यात तफावत आढळत असल्याने, अन्य मृत्युमागची नेमकी कारणे काय याची माहिती घेतली असता, मध्यंतरी कोविडपेक्षा अधिक मृत्यू हे सारीने होत असल्याचा अंदाज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन. एस. चव्हाण यांनी व्यक्त केला होता. मात्र, याची नेमकी आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नव्हती, मात्र, सारीने मृत्यू वाढल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
एकत्रित सर्वत्र मृत्यू वाढल्याचे चित्र आहे. त्यातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गंभीर रुग्णांनाच दाखल करण्यात येत असल्याने, या ठिकाणी अधिक मृत्यू नोंदविण्यात येत आहे. मात्र, बहुतांश रुग्ण हे उशिरा रुग्णालयात दाखल होत असल्याने, त्यांचा मृत्यू होत असल्याचे निरीक्षक डॉक्टरांनी नोंदविले आहे. अनेक मृत्यू हे केवळ सहा तासांच्या आतच होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कमी वयाचे मृत्यू
चाळीस वर्षापेक्षा कमी वयाचे मृत्यूही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, यात पाच वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. मात्र, कोरोना असला, तरी मुळात या बाळाची प्रकृती कमी दिवसात जन्म झाल्याने जन्मताच गंभीर होती. याला त्याचे वजन कमी असणे, कमी दिवसाचा असणे याबाबी होत्या, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
अशी आहे नोंद
१४ एप्रिल १३ मृत्यू
१५ एप्रिल १२ मृत्यू
१६ एप्रिल १२ मृत्यू