मेहरूण तलावावर ३७ जाती-प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 06:41 PM2019-05-11T18:41:22+5:302019-05-11T18:45:03+5:30
जागतिक स्थलांतरीत पक्षी दिन : ४९६ पक्षी आढळले तलावावर
जळगाव- जागतिक स्थलांतरीत पक्षी दिनानिमित्त निसर्ग मित्रांतर्फे शनिवारी मेहरूण तलावावर पक्षी निरिक्षण व गणनासह प्लॅस्टिकचे घातक परिणाम यावर प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात आला. पक्षी गणननेमध्ये मेहरूण तलावावर ३७ विविध जाती-प्रजातींच्या पक्षींची नोंद घेण्यात आली असून विदेशी स्थलांतरीत पक्षी मात्र आढळून आलेले नाहीत.
निसर्ग मित्र आणि पक्षी मित्रांनी मेहरूण तलावावर सकाळी ६.३० ते ८ वाजेपर्यंत पक्षी गणना केली़ यावेळी १९ पक्षी प्रेमी नागरिकांनी सिटीझन साइंटीस्ट म्हणून आपला सहभाग नोंदविला. अडीच तासाच्या गणनेमध्ये ३७ विविध पक्षींच्या जाती-प्रजाती तलावावर आढळून आल्या़ यावेळी संख्या एकूण गणना केली असता तब्बल ४९६ पक्षी याप्रसंगी आढळून आले़ मात्र, हे सर्व पक्षी स्थानिक स्थलांतरीत असल्याचे पक्षी मित्रांना दिसून आले.
सन २००६ पासून जगभरात वर्षातून दोनदा स्थलांतरीत पक्षी दिन साजरा केला जातो. आॅक्टोबर महिन्याच्या आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा दिन साजरा करण्यात येतो. हा दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी नवीन संकल्पना राबवण्यात येते. या वर्षी प्रोटेक्ट बर्ड, बी अ सोल्यूशन टू प्लॅस्टिक पोल्यूशन हे घोषवाक्य घेऊन हा दिन साजरा करण्यात आला़ स्थलांतरीत पक्षांमध्ये मुख्यत: पाणथळ पक्षी मोठ्या प्रमाणावर असतात. समुद्र, नदी, तलाव या त्यांच्या महत्वाच्या अधिवासांना घेरणारा प्लॅस्टिक कचरा तसेच प्रचंड तापमानामुळे आटत चालेले जलस्त्रोत हे पक्षांच्या अस्तित्वास अत्यंत धोकादायक ठरत आहे. याच संकल्पनेवर आधारित निसर्ग मित्रतर्फे प्लॅस्टिक, पक्षी व एकूण प्राणीजगत, पर्यावरणावर होणाºया घातक परिणामांची माहिती पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.
यांचा होता सहभाग
मेहरूण तलावावर राबवण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण व पक्षी गणना या उपक्रमात हेमलता पाटील, वेदश्री पाटील, योगेश सोनार, नारायण सोनार, चेतन वाणी, सुमित माळी, सुधाकर माळी, सोमेश वाघ, धनश्री बागुल, गोकुळ इंगळे, मुकेश कुरील, कृष्णाकुरील, विलास बर्डे, चिन्मय बारुदवाले, रेवीन चौधरी, सुमेध सोनावणे यांनी सहभाग घेतला. या गणनेत प्रामुख्याने छोटा पाणकावळा, गाय बगळा, छोटा बगळा, मध्यम बगळा, ढोकरी, हळदी-कुंकू बदक, वारकरी, टिबुकली, कंठेरी चिलखा,नदी सुरय, शेकाट्या हे पाणथळ पक्षी त्याचबरोबर वृक्ष निवासी निळ्या शेपटीचा वेडा राघू या स्थलांतरीत पक्षाची नोंद झाली.