केंद्रीय गृहमंत्र्यांना तब्बल ३८ वाहनांचे कवच...!
By अमित महाबळ | Published: March 5, 2024 09:32 PM2024-03-05T21:32:01+5:302024-03-05T21:32:10+5:30
अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी तब्बल ३८ वाहनांचे कवच पुरविण्यात आले होते.
जळगाव : भाजपाच्या वतीने सागर पार्कवर मंगळवारी (दि.५), आयोजित युवा संमेलन झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोर्ट चौकातील भाजपाच्या कार्यालयाला भेट देऊन त्याचे उद्घाटन केले. या ठिकाणी पूर्वी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे संपर्क कार्यालय अर्थात जीएम फाउंडेशन होते. सागर पार्क ते शिवतीर्थ मैदानापर्यंतच्या रस्त्यावर अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी तब्बल ३८ वाहनांचे कवच पुरविण्यात आले होते.
अमित शाह यांच्या वाहनांच्या ताफ्यात केंद्रीय सुरक्षादल, जिल्हा पोलिस दल, महसूल प्रशासन, आरोग्य विभागाच्या सुसज्ज रुग्णवाहिका यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची वाहने होती. गृहमंत्र्यांचा ताफा येण्यापूर्वी संपूर्ण रस्त्यावरील वाहतूक रोखून ठेवण्यात आली होती. त्यापूर्वी तीन वेळा वॉर्निंग देणारे पोलिस वाहन रस्त्यावरून फिरविण्यात आले. चौथ्या वेळेस ताफ्याचे आगमन झाले. दरम्यान, शाह यांचा ताफा येणार असल्याचे कळताच रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. शालेय विद्यार्थी ठिकठिकाणी चौकामध्ये थांबून होते.
विद्यार्थ्यांना हात जोडून नमस्कार...
अमित शाह ताफ्यात असलेल्या सहाव्या क्रमांकाच्या वाहनात बसलेले होते. ते रस्त्याने उभे असलेल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना नमस्कार करताना दिसून आले. स्टेट बँक चौकात अनेक शालेय विद्यार्थी अमित शहांना पाहण्यासाठी थांबून होते. त्यांनीही अमित शाहांना नमस्कार केला.