आमदार निधीला संपाची ‘साडेसाती’! अखर्चिक रकमेसाठी हातात आठ दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2023 07:14 PM2023-03-16T19:14:41+5:302023-03-16T19:15:04+5:30
जळगाव जिल्ह्यातील आमदारांसाठी शासनाकडून प्राप्त झालेला प्रत्येकी ४ कोटींची निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करावा लागणार आहे.
कुंदन पाटील
जळगाव : जिल्ह्यातील आमदारांसाठी शासनाकडून प्राप्त झालेला प्रत्येकी ४ कोटींची निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करावा लागणार आहे. सार्वजनिक सुट्या गृहित धरल्यानंतर हा निधी खर्च करण्यासाठी आमदारांच्या हातात फक्त ८ दिवस शिल्लक आहेत. मात्र संपामुळे विकास कामांच्या प्रस्तावांचे सादरीकरण लांबल्याने ७ कोटी ६८ लाखांचा निधी वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार चिमणराव पाटील व मंगेश चव्हाण यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील दोन विधान परिषद सदस्यांसह १३ आमदारांना ४९ कोटी ६६ लाखांचा निधी राज्य शासनाने दिला होता. त्यातील ४१ कोटी ९८ लाखांचा निधी आमदारांनी खर्च केला आहे. उर्वरित ७ कोटी ६८ लाखांचा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करावयाचा आहे. लता सोनवणे, संजय सावकारे, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, सुरेश भोळे यांनी खर्च करण्यात आघाडी घेतली आहे. मात्र पालकमंत्र्यांसह मंत्री महाजन यांचा अनुक्रमे ६० लाख व १ कोटी ४४ लाखांचा निधी अखर्चित आहे. त्यामुळे त्यांना ३१ मार्चपूर्वी विकास कामांसाठी निधी मंजूर करुन घ्यावा लागणार आहे.
आठच दिवस हातात
दि.१७ मार्च ते ३१ मार्चदरम्यान गुढी पाडवा आणि श्रीराम नवमीची प्रत्येकी दिवस सुटी आहे. तसेच प्रत्येकी दोन शनिवार आणि रविवार येत असल्याने चार दिवस हातून जाणार आहेत. त्यामुळे आमदारांच्या हातात फक्त आठ दिवसांचा कालावधी उरला आहे.तशातच संप सुरु असल्याने विकास कामांच्या प्रस्तावासह मंजुरीसाठी कर्मचारी सेवेत नाहीत. त्यामुळे या आमदारांची चांगलीच कोंडी होऊन बसली आहे.
असा आहे अखर्चित निधी
दि.१६ मार्चपर्यंत आमदारांनी खर्च केलेल्या ४ कोटींच्या निधीपैकी अखर्चित निधी असा : लता सोनवणे (९ लाख), गिरीश महाजन (१ कोटी ४४ लाख), सुरेश भोळे (१७ लाख), गुलाबराव पाटील (६० लाख), चिमणराव पाटील (८४ लाख), अनील पाटील (१२ लाख), किशोर पाटील (३ लाख), मंगेश चव्हाण (८३ लाख), संजय सावकारे (१ लाख), चंद्रकांत पाटील (२ लाख) व शिरीष चौधरी (९६ लाख).
पटेल यांचा सर्वाधिक निधी वाया
विधानपरिषदेचे तत्कालीन सदस्य चंदूलाल पटेल यांना ३ कोटींचा निधी दिला होता. त्यापैकी २ कोटी ६६ लाखांचा निधी त्यांनी खर्च करण्याआधीच त्यांची आमदारकीचा कालावधी संपुष्टात आला. तर एकनाथ खडसे यांचा ३ कोटींपैकी ३७ लाखांचा निधी अखर्चित आहे.