खान्देशातील २३२ पैकी १२४ प्राचार्यांची पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 12:39 PM2020-03-05T12:39:41+5:302020-03-05T12:39:56+5:30
जळगाव : खान्देशातील २३२ पैकी १२४ महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली़ आहे़ त्यामुळे ही पदे ...
जळगाव : खान्देशातील २३२ पैकी १२४ महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली़ आहे़ त्यामुळे ही पदे लवकरात लवकर न भरल्यास संबंधित महाविद्यालय व परिसंस्थेवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने दिली आहे.
महाविद्यालयातील शिक्षण प्रोत्साहित करणे, समन्वय राखणे, परीक्षा व संशोधनाचा दर्जा राखण्यासाठी तसेच प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे या हेतूने नियमित प्राचार्य व संचालक कार्यरत असणे अनिवार्य आहे़ त्यामुळे विद्यापीठ अनुदार आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद तसेच महाराष्ट्र शासनातर्फे संलग्नित महाविद्यालयातील नियमित प्राचार्य व मान्यताप्राप्त परिसंस्थेतील संचालकांची पदे भरण्याबाबत विद्यापीठास आदेश केले होते़ त्यानुसार विद्यापीठाने रिक्त पदे भरण्याच्या सूचना महाविद्यालये व परिसंस्थांना केल्या होत्या़ परंतू, तरी देखील १२४ महाविद्यालयांमध्ये प्राचार्यचं नसल्याची बाब समोर आली आहे़
रिक्त पदे भरा, अन्यथा महाविद्यालयांवर कारवाई
रिक्त पदांची माहिती विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्र शासन यांना सादर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा निदर्शनात आल्या़ त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोग व शासनाने प्राचार्य व संचालकांची रिक्त पदे न भरल्यामुळे खेद व्यक्त केला आहे़ ही गंभीर बाब असल्यामुळे विद्यापीठाकडून या प्रकाराची गंभीर दखल घेत ज्या महाविद्यालयांमध्ये प्राचार्य आणि ज्या संस्थांमध्ये संचालकांची पदे रिक्त असतील ती त्यांनी त्वरित भरावी, अशा सूचना विद्यापीठाकडून करण्यात आल्या आहेत़ रिक्त जागा न भरल्यास कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही विद्यापीठ प्रशासनाकडून पत्रकाद्वारे दिली आहे़ दरम्यान, जळगाव जिल्ह्यात तब्बल ६२, धुळे जिल्ह्यात ३८ तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये २४ प्राचार्यांची पदे रिक्त आहेत़