२४ गाळ्यांना ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:22 PM2019-11-08T12:22:59+5:302019-11-08T12:23:29+5:30
मनपाची सर्वात मोठी कारवाई : पैसे भरा अन्यथा कारवाई अटळ
जळगाव : मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या महात्मा फुले मार्केटमधील तब्बल २४ गाळे गुरुवारी मनपा प्रशासनाकडून सील करण्यात आले. या कारवाई दरम्यान गाळेधारक व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद झाले. मात्र, पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तामुळे ही कारवाई शांततेत पार पडली. दरम्यान, गाळेधारकांना थकीत भाडे भरण्याशिवाय पर्याय नसून, थकीत भाडे न भरण्यास टप्प्याटप्प्याने गाळे सील करण्याचा इशारा मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनपा उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली फुले मार्केटमध्ये कारवाईला सुरुवात करण्यात आली. कारवाईसाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.
अतिक्रमण अधीक्षक एच.एम.खान, किरकोळ वसुली विभागाचे प्रमुख नरेंद्र चौधरी, प्रभाग समिती एक चे प्रमुख व्हि.ओ.सोनवणी, विधीशाखा प्रमुख किरण भोळे, राजेंद्र पाटील यांच्यासह ५० ते ६० जणांचे दोन पथक तयार कण्यात आले.
सर्वात मोठी कारवाई
-२०१२ पासून १८ मार्केटची मुदत संपल्यानंतर करार वाढवून मिळावा म्हणून हे प्रकरण न्यायालयात गेले होते. मात्र, न्यायालयात देखील गाळेधारकांना दिलासा न मिळाल्याने शासनाकडून गाळेधारकांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शासनाकडूनही गाळेधारकांची निराशा झाली.
-मनपाकडून राजकीय दबावामुळे न्यायालयाचे आदेश मिळाल्यावर देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. २०१५-१६ मध्ये तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी ८ गाळे सील केले होते. त्यानंतर दीड वर्ष मनपाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
-२०१८ मध्ये तत्कालीन प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी ६ गाळे सील केले होते. त्यानंतरचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी कारवाई केली नाही. विद्यमान आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांच्या कार्यकाळात आतापर्यंत ४० गाळे सील करण्यात आले आहेत. गुरुवारी झालेली कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून, एकूण २८ गाळे एकाच दिवसात सील करण्यात आली आहेत.