रेल्वेच्या उत्पन्नात ४० टक्क्याने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 10:10 PM2020-09-22T22:10:28+5:302020-09-22T22:11:29+5:30
आंतरराज्य वाहतुकीचा लाभ : २० दिवसात प्रवाशांच्या माध्यमातून ३१ लाखांची कमाई
भुसावळ : कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती व नंतर काही विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र अनलॉक प्रक्रियेत २ सप्टेंबर पासून आंतरराज्य रेल्वे प्रवासाला मुभा दिल्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या २० दिवसात भुसावळ रेल्वे स्थानका वरून तब्बल ११ हजार प्रवाशांनी ३१ लाखांचे तिकीट बुकिंग केले आहे.
भुसावळ स्थानकावरून
धावतात ५० गाड्या
कोरोना काळात अनलॉक नंतर हळूहळू प्रवासी गाड्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येत आहे. यातच रेल्वे प्रशासनातर्फे क्लोन ट्रेन सुद्धा नवीन सुरू करण्यात येत आहे. याशिवाय काही साप्ताहिक गाड्या सुरू करण्यात आल्या आहे. यामुळे भुसावळ विभागातून सुमारे अप -डाऊन मध्ये ५० रेल्वे धावत आहे.
अनेकांनी केली बुकींग
भुसावळ रेल्वेस्थानका वरून आंतरराज्य तसेच इतर राज्यांमध्ये जाण्यासाठी १ ते १० सप्टेंबर या कालखंडात ५ हजार प्रवाशांनी तिकीट बुकिंग केली व यातून रेल्वे प्रशासनाला १४ लाख ८६ हजारांचे उत्पन्न मिळाले तर ११ ते २० सप्टेंबर या कालखंडामध्ये रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ झाली व नंतरच्या दहा दिवसात पाच हजार ७०० प्रवाशांनी १५ लाख ९५ हजार रुपयांचे तिकीट बुक करून रेल्वे प्रवास सुनिश्चित केला. एकंदरीत २ सप्टेंबर पासून आंतरराज्य प्रवासासाठी मुभा मिळाल्यानंतर रेल्वेच्या उत्पन्नात तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झालेली आहे
फक्त आरक्षण तिकीट
असल्यास प्रवासाची मुभा
कोरोनाकाळामध्ये खऱ्या अर्थाने रेल्वेने सुसहय प्रवास होत आहे. पूर्वी सामान्य, सलीपर क्लास व एसी क्लास मधून वेटिंग तिकीट जरी असले तरी दरवाजा पर्यंत भरगच्च गर्दीसह प्रवास करावा लागत होता. मात्र कोरोना काळामध्ये रेल्वे प्रशासनाने प्रवासासाठी निर्बंध घातले असून प्रवासाकरीता फक्त कन्फर्म तिकीट असेल त्याच प्रवाशांना रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश दिला जात आहे.
दरम्यान आता हळूहळू प्रवाशांची संख्या वाढत असल्याने रेल्वेचे उत्पन्नही आणखी पुढे निश्चितच वाढणार आहे.