४० टक्के शहराचा पाणीपुरवठा बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2017 12:11 AM2017-01-04T00:11:38+5:302017-01-04T00:11:38+5:30
धुळे : मनपाने पाणीपट्टी न भरल्याने पाटबंधारे विभागाने मंगळवारी सायंकाळी नकाणे तलावातून होणारा पाणीपुरवठा खंडित केल्यामुळे ४० टक्के शहरावर ऐन हिवाळयात पाण्याचे संकट ओढवले आहे़
धुळे : मनपाने पाणीपट्टी न भरल्याने पाटबंधारे विभागाने मंगळवारी सायंकाळी नकाणे तलावातून होणारा पाणीपुरवठा खंडित केल्यामुळे ४० टक्के शहरावर ऐन हिवाळयात पाण्याचे संकट ओढवले आहे़ दरम्यान, पाटबंधारे विभागाने कारवाई करताच मनपा प्रशासनाची धावपळ सुरू झाली, रात्री उशिरापर्यंत मनपात वरिष्ठ अधिकाºयांकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते़
शहराला नकाणे तलाव व सुलवाडे बॅरेजवरून मनपाला पाणीपुरवठा केला जातो़ त्यासाठी पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टी आकारली जाते़ दरम्यान, मनपाकडे डिसेंबर अखेरपर्यंत थकीत व चालू अशी एकूण ३ कोटी ७ लाख रुपयांची पाणीपट्टी भरावी, यासाठी पाटबंधारे विभागाने मनपा प्रशासनाला वारंवार नोटिसा दिल्या होत्या़
अखेर पाटबंधारे विभागाने २७ डिसेंबरला नोटीस देऊन ३ जानेवारीला पाणीपुरवठा खंडित करणार असल्याचे मनपाला सूचित केले होते़ त्यानंतरही नोटिसीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मंगळवारी दुपारी अंतिम नोटीस देऊन सायंकाळी पाच वाजता नकाणे तलावाचे गेट बंद करून पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले़ पाणीपुरवठा खंडित होताच मनपा प्रशासनाची धावपळ उडाली़ तातडीने ४३ लाख ४ हजार ८६ रुपयांचा धनादेश देण्याची तयारी दर्शवित निवासी उपजिल्हाधिकारी तसेच पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली़ मनपाचे लेखाधिकारी माधव सराई दोन दिवसांपासून रजेवर असून धनादेशावर त्यांची स्वाक्षरी आवश्यक असल्याने पाटबंधारे विभागाने कारवाई बुधवारपर्यंत स्थगित करावी, अशी मागणी केली होती, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले़ दरम्यान, मनपाने वर्षभरात ३६० दलघफू पाणी घेणे करारानुसार आवश्यक आहे़ त्यामुळे दररोज ०़७० दलघफू पाणी उचलणे अपेक्षित असताना मनपाकडून दररोज २ दलघफूपेक्षा अधिक पाणी उचलले जात असून त्यावरदेखील पाटबंधारे विभागाने आक्षेप नोंदविला होता़ दरम्यान, बुधवारी मनपाकडून पाणीपट्टी भरली जाण्याची शक्यता आहे़ नकाणे तलावातून शहराच्या ४० टक्के भागाला पाणीपुरवठा केला जातो़ शहराची लोकसंख्या सध्या ४ लाखांच्या जवळपास असल्यामुळे जवळपास दीड लाखापेक्षा अधिक नागरिकांना या कारवाईचा फटका बसू शकतो़
पाटबंधारे विभागाकडून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असला तरी महापालिकेकडून लवकरच पाणीपट्टी भरण्यात येणार असून पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत केला जाईल़
-संगीता धायगुडे
आयुक्त, मनपा, धुळे