मेगाब्लॉकच्या पहिल्या दिवशी ४० टक्के काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:14 AM2021-07-17T04:14:06+5:302021-07-17T04:14:06+5:30
दिवसभरात सिंग्नल यंत्रणेचे ४० टक्के काम भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सध्या जळगाव ते भादलीदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. ...
दिवसभरात सिंग्नल यंत्रणेचे ४० टक्के काम
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सध्या जळगाव ते भादलीदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. शुक्रवारी सकाळी मेगाब्लॉकच्या या कामाला सुरूवात झाली. या मेगा ब्लॉकच्या काळात जळगाव रेल्वे स्टेशनच्या हद्दीत काही ठिकाणी सिग्नल यंत्रणेत बदल तर काही ठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणा टाकण्यात येत आहे. तर या नविन सिग्नल यंत्रणेवरून सुरत मार्गाकडे जाणाऱ्या गाड्या ‘टर्मिनेट’ होण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी आठपर्यंत हे काम चालणार आहे. दरम्यान, या मेगाब्लॉकमुळे रेल्वे स्टेशनच्या हद्दीतुन जाणाऱ्या सर्व गाड्या ताशी ३० किमी वेगाने अर्थात अत्यंत संथ गतीने धावल्या.
इन्फो :
कर्मचाऱ्यांनी पार पाडली सिग्नल यंत्रणेची भुमिका
रेल्वे प्रशासनातर्फे सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी जळगाव रेल्वे स्टेशनच्या हद्दीत, साधारणत : दोन किलोमीटर पर्यंत सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती. या दोन किलोमीटरच्या रेड सिग्नल दाखवून, सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी उभे राहुन, रेल्वे गाड्यांना मार्ग दाखविला.
इन्फो :
एडीआरएम यांनी केली कामाची पाहणी
सकाळी मेगाब्लॉकच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर भुसावळ विभागाचे एडीआरएम मनोजकुमार सिन्हा यांनी जळगावी येऊन, या मेगाब्लॉकच्या कामाची ठिकाणी एक तास पाहणी केली. यावेळी त्यांनी सिग्नल यंत्रणेचे तांत्रिक काम चोख पद्धतीने पार पाडण्याच्या सुचनाही कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी जळगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक अमरचंद अगरवाल व इतर अधिकारी उपस्थित होते.
इन्फो :
रेल्वे गेट बंद असल्याने हजारो वाहनधारकांची गैरसोय
तिसऱ्या रेल्वे मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे रेल्वे प्रशासनाने असोदा गेट व भादली गेट दोन दिवस दिवस बंद ठेवले आहे. परिणामी यामुळे शुक्रवारी सकाळी असोदा गेट बंद झाल्यावर वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली. त्यामुळे या मार्गावरील हजारो वाहनधारकांना प्रजापत नगरातून ममुराबाद पुलामार्गे शनिपेठकडे गावात यावे लागले. विशेष म्हणजे पावसामुळे हा रस्ता अतिशय चिखलमय झाल्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. तसेच दोन वर्षांपासून या रेल्वे मार्गाकडील पर्यायी रस्त्याची अद्याप दुरूस्ती न करण्यात आल्यामुळे, नागरिकांमधुन मनपा प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हे गेट बंद असल्यामुळे प्रवासी वाहनधारक व रिक्षा चालकांनी गेटवरच प्रवाशांना सोडले व पुन्हा हे प्रवासी गेटच्या पलीकडे उभ्या असलेल्या वाहनांमधुन गावकडे परतले.