जळगाव जिल्ह्यातील ४०० सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ‘रडार’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 06:53 PM2018-09-04T18:53:45+5:302018-09-04T18:56:50+5:30
पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची माहिती
जळगाव : जिल्ह्यातील गुन्हेगारी, चोरी व घरफोडीच्या घटनांना नियंत्रणात आणण्यासाठी नियमित सराईत गुन्हेगार वगळता जिल्ह्यात तब्बल नवीन ४०० सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. महिनाभरात त्यांच्यावर कारवाई झालेली असेल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. दरम्यान, पोलीस दलातर्फे विघ्नहर्ता पुरस्कार योजना सुरु करण्यात आलेली असून गणेशोत्सवात गणेश मंडळांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षकपदी जळगावात रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच दत्तात्रय शिंदे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी त्यांचे स्वागत केले. आगामी गणेशोत्सव तसेच पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. त्यांच्याशी झालेला संवाद प्रश्नोत्तर स्वरुपात असा
गणेशोत्सवासाठी पोलीस दलाची तयारी
हा उत्सव शांततेत व आनंदात पार पाडावा यासाठी पोलीस दल सज्ज आहे. धार्मिक उत्सवात जातीय सलोखा योजना कार्यान्वित केली आहे. त्यात विधायक कामे, उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. समाजाभिमुख काम करणाºयांना शाबासकी मिळावी यासाठी गणेश मंडळांना बक्षीस दिले जाणार आहे. त्यासाठी मूल्यमापन समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती गुणांकन करुन उत्कृष्ट मंडळाची निवड करेल. पोलीस स्टेशन स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय असे बक्षीस दिले जाणार आहे. तर जिल्हा स्तरावरही तीन बक्षीसे दिली जातील, असेही शिंदे यांनी सांगितले.
चोºया व घरफोड्या रोखण्यासाठी गुन्हेगारांवर ‘नजर’
दत्तात्रय शिंदे म्हणाले, जिल्ह्याची जनता शांतताप्रिय आहे. या जिल्ह्यात काम करायला खूप वाव आहे. विशिष्ट पध्दतीचे गुन्हे वाढले आहेत. दुचाकी चोर व घरफोडी या घटनांना रोखण्यासाठी गुन्हेगारांच्या हालचाली टिपणे, रात्रीच्या गस्तीत सराईत गुन्हेगार तपासले जाणार आहेत.काही जण व्यवसाय पध्दतीची गुन्हेगारी करतात. ते कधीच रेकॉर्डवर आलेले नाहीत, अशा ४०० जणांची यादी तयार झाली आहे, त्यांच्यावर महिनाभरात कारवाई करु. नाकाबंदी, वाहनांची तपासणी यातून रस्त्यावरची सुरक्षा सांभाळली जाते.