जिल्ह्यातील ८३ हजार शेतकऱ्यांना ४२० कोटींचे कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:17 AM2021-05-20T04:17:51+5:302021-05-20T04:17:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात हंगामपूर्व कापूस लागवडीला सुरुवात झाली आहे. खरिपाच्या तयारीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ८३ हजार ४९ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात हंगामपूर्व कापूस लागवडीला सुरुवात झाली आहे. खरिपाच्या तयारीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ८३ हजार ४९ शेतकऱ्यांना सुमारे ४२० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. दरम्यान, कर्ज वितरण करण्याचे काम अजूनही संथ गतीने असून, लवकरात लवकर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात यावे, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेती क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. शेतमालाला भाव नाही, त्यात नैसर्गिक अडचणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या वर्षी शेतकऱ्यांना दर वर्षाच्या तुलनेत कर्जाची गरज आहे. मात्र, जिल्हा बँक, खासगी व शासकीय बँकांकडून शेतकऱ्यांना फिरवले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी जिल्हा बँका, खासगी बँका, राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेणे सुरू केले आहे. त्यासाठीचा ७/१२ उतारा, इतर कागदपत्रे बँकांकडे जमा केली आहेत. जिल्हा बँकेच्या ६० टक्के शेतकरी सभासदांना कर्जही मिळाले आहे. यंदा जिल्हा बँकेने ८० हजार १७१ सभासदांना ३२८ कोटींचे कर्ज वाटप केले आहे.
जिल्हा बँकेला ५२४ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट
राज्य शासनाकडून जिल्हा बँकेला या वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५२४ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी जिल्हा बँकेने ३२८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. यामुळे जिल्हा बँकेचे सभासद असलेला सभासद शेतकरी खरिपासाठी लागणारे बियाणे, खते, नवीन बैलजोडी इतर साधने घेण्यासाठी मोकळा झाला आहे. दरम्यान, जिल्हा बँकेला जरी ५२४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असले, तरी हे उद्दिष्ट पूर्ण केले जात नाही, असा आरोपदेखील शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
हेक्टरी कर्जाची रक्कम वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी
जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना बागायतीसाठी हेक्टरमागे ८५ हजार तर कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरमागे ४५ हजार रुपयांचे कर्ज मिळते. शेतकऱ्यांना हेक्टरमागे लागणारा खर्च हा दीड लाखापर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरमागे दोन लाख रुपयांचे कर्ज मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक
खरीप हंगाम तोंडावर आलेला असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे. जिल्हा बँकेने एकीकडे शेतकऱ्यांना ३३८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असताना, दुसरीकडे मात्र राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ २ हजार शेतकऱ्यांना ३६ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. तर खाजगी बँकांनी ३३९ शेतकऱ्यांना ५६ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.
पालकमंत्र्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष
बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास संबंधित बँकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला होता. मात्र अजूनही बँकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. तर शेतकरी खरिपाच्या तयारीला लागले आहेत. शेतातील काडीकचरा वेचणे, बांधावरील गवत जाळणे, शेत स्वच्छ करणे व मशागतीसाठी शेत तयार करणे अशी कामे सुरू आहेत.
कर्जाचे झालेले वाटप
बँक - शेतकरी - कर्जाची रक्कम
जिल्हा बँक - ८० हजार १७१ - ३२८ कोटी १५ लाख
खासगी बँक - ३२९ - ५६ कोटी
राष्ट्रीयीकृत बँक - २ हजार ५४९ - ३६ कोटी ३८ लाख