जळगावात कृषि क्षेत्रासाठी ४ हजार २३६ कोटी ४२ लाख कर्जाचे होणार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:31 PM2018-04-01T12:31:21+5:302018-04-01T12:31:21+5:30
वार्षिक कर्ज योजना अहवालाचे प्रकाशन
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १ - वार्षिक कर्ज योजनेचा जिल्ह्याचा २०१८-१९ चा आराखडा शनिवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते प्रकाशित करण्यात आला. यात यंदा कृषि क्षेत्रासाठी ४ हजार २३६ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट आहे तर विविध क्षेत्रांचा मिळून एकूण ६ हजार २०९ कोटी रुपयांचा कर्ज आराखडा नियोजित करण्यात आला आहे.
कृषि व अकृषि क्षेत्रातील विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून बँकांनी गरजूंना अर्थसहाय्य करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी या वेळी केले.
यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक पी. पी. गिलाणकर, जिल्हा उप निबंधक, विशाल जाधवर, नाबार्डचे जी. एम. सोमवंशी, विवेक पाटील, जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख, विविध बँकांचे प्रतिनिधी प्रवीण मुळे, प्रदीप व्यवहारे, संजय लोणारे, दिनेश चौधरी, अजय शर्मा, गुलशनकुमार सिंग आदी उपस्थित होते.
यावेळी जळगाव जिल्हा वार्षिक कर्ज योजनेचा आढावा सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात २०१८-१९ साठी पिक कर्जाकरीता ३ हजार २०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर अन्य स्वरुपाच्या कृषि कर्जांसाठी (मुदतीची कर्जे) १ हजार ३६ कोटी ४२ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. असे एकूण कृषि क्षेत्रासाठी ४ हजार २३६ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट आहे. तर अकृषिक क्षेत्रासाठी ९४२ कोटी ५ हजार रुपये, अन्य प्राधान्य क्षेत्रासाठी ८३५ कोटी ३८ लाख रुपये उद्दिष्ट आहे. तर अन्य क्षेत्रांसाठी १९५ कोटी १५ लाख रुपये असे एकूण ६ हजार २०९ कोटी रुपयांचा कर्ज आराखडा नियोजित करण्यात आला आहे.
मागील वर्षी ५ हजार ९८० कोटी ७ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४ हजार ३२९ कोटी ७२ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती गिलाणकर यांनी यावेळी दिली. यावर्षी कर्जे वाटपाचे देण्यात आलेले उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्व बँकांनी मिळून पूर्ण करुन जिल्ह्यातील गरजूंना व शेतकऱ्यांना वेळेवर अर्थसहाय्य मिळेल याचे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.