चक्रीवादळ व गारपिटीच्या तडाख्यात केळीचे ४२.४० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 04:44 PM2019-06-11T16:44:10+5:302019-06-11T16:45:07+5:30
रावेर , जि.जळगाव : रोहिणी नक्षत्रातील वादळी पावसाने शुक्रवारी सायंकाळी चक्रीवादळासह गारपिटीचा तडाखा दिल्याने तालुक्यातील १०८ शेतकऱ्यांचे तब्बल चार ...
रावेर, जि.जळगाव : रोहिणी नक्षत्रातील वादळी पावसाने शुक्रवारी सायंकाळी चक्रीवादळासह गारपिटीचा तडाखा दिल्याने तालुक्यातील १०८ शेतकऱ्यांचे तब्बल चार महिन्यांच्या असह्य तापमानात काहूर झालेल्या १०६ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त झाल्या होत्या. ४२ लाख ४० हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज तालुका प्रशासनाने आपल्या प्राथमिक अहवालात वर्तवला आहे. दरम्यान, आज खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प.सदस्य कैलास सरोदे, शिवाजीराव पाटील, तहसीलदार अभिलाषा देवगुणे व तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली.
रावेर तालुक्यातील १ जून रोजी वादळी पावसाने नुकसान झालेल्या केळी बागांचे पंचनामे पूर्णत्वास येत नाहीत तोच, रोहिणी नक्षत्रातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपिटीच्या रावेर शहरासह तालूक्यातील लुमखेडा, उदळी, सावदा, कोचूर, खिरोदा प्र.यावल, बोरखेडा, तामसवाडी, पुनखेडा, पातोंडी परिसरात जबर तडाखा बसला होता.
रावेर शहरात मोठ मोठी झाडे व झाडांचे फांद्या वीजखांबांसह वीजतारांवर पडून रावेर शहरासह खानापूर व मोरगाव वीज उपकेंद्रातील १५ गावे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अंधारात बुडाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
या वादळी तडाख्याने शहरातील सुनील रायपूरकर, राजेश पांडे, अशोक भावसार, सतिश भावसार बाविस्कर यांच्या घरांवरील टीनपत्र्याचे छत उडून तर अंशत: पडझड होऊन २७ हजार रुपये चे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी डी व्ही कांबळे यांनी केला आहे.