शिरसोली येथे ४३२ जणांचे झाले लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:18 AM2021-05-27T04:18:18+5:302021-05-27T04:18:18+5:30
शिरसोली प्र बो. व प्र. नं. या दोन्ही गावांची लोकसंख्या ही ४० हजारांच्या जवळपास असून, येथील ग्रामस्थांना लस घेण्यासाठी ...
शिरसोली प्र बो. व प्र. नं. या दोन्ही गावांची लोकसंख्या ही ४० हजारांच्या जवळपास असून, येथील ग्रामस्थांना लस घेण्यासाठी १३ कि.मी. अंतरावर असणाऱ्या म्हसावद येथे जावे लागत होते. मात्र, शिरसोली येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर १० दिवसांपूर्वी येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. लसीकरण केंद्र सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४३२ जणांचेच लसीकरण झाले आहे. लस उपलब्ध झाल्यास वैद्यकीय अधिकारी नीलेश अग्रवाल, सुषमा थोरात, योजना तायडे, राजश्री वाघोदे, कल्पना फुसे, नीलेश चौधरी व अनिल महाजन हे लसीकरणाची जबाबदारी पार पाडत आहेत. लसींच्या तुटवड्यामुळे येथील लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध होत नसल्याने बऱ्याच वेळा येथील लसीकरण बंद असते. यामुळे येथील ग्रामस्थांना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्राच्या चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे येथे नियमित लस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.