सफाई ठेक्यांमध्ये दरमहा ४४ लाखांचा अपहार
By admin | Published: July 10, 2017 12:43 AM2017-07-10T00:43:57+5:302017-07-10T00:43:57+5:30
अश्विनी देशमुख यांचा आरोप : आयुक्त, उपायुक्तांसह अधिकाºयांवर गुन्हे दाखलची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपाच्या सफाई ठेक्यांमध्ये दरमहा सुमारे ४४ लाखांचा अपहार होत असून ही रक्कम मक्तेदार, तसेच आयुक्त, उपायुक्त, आरोग्याधिकाºयांसह कर्मचारी वाटून घेत असल्याचा आरोप राष्टÑवादी काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी देशमुख व त्यांचे पती विनोद देशमुख यांनी रविवारी, सकाळी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रपरिषदेत केला.
याप्रकरणी सोमवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असून प्रभाग ३६ मधील ठेक्यात भागीदार असलेल्या नगरसेविका ज्योती चव्हाण यांना अपात्र ठरविण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडणूक लढायचीय, पैसे कमवा
प्रभाग ३६ मधील सफाईचा मक्ता ‘सहजीवन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था’ या नावाने घेण्यात आला आहे. त्यात भाजपाच्या नगरसेविका व माजी स्थायी समिती ज्योती चव्हाण व त्यांचे पती मनपा कर्मचारी असलेले बाळासाहेब चव्हाण हे देखील सफाई मक्त्यात भागीदार असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
प्रभागात सफाई होत नसल्याने प्रशासनाकडे तक्रारी केल्याने प्रारंभी मक्तेदारांकडून आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील यांच्यामार्फत तसेच आरोग्य निरीक्षकांमार्फत पैसे घेऊन तक्रारी न करण्याच्या तोंडी आॅफर आल्या. मात्र याबाबत तक्रार करावयाची तर पुरावे हवेत म्हणून सकारात्मकता दाखवित बैठकीस जाण्याचे मान्य केले. नगरसेविका ज्योती चव्हाण यांच्या घरी पहिली बैठक झाली. त्यात त्यांनी तसेच त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांनी निवडणुकीला १८ महिने राहिलेत. आपल्यालाही पैसे लागणार आहेत. पैसे कमवा असे सुचविले. तर विनोद देशमुख यांनी माजी नगरसेवक पिंटू जाधव, तसेच नितीन सपके आम्हाला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. याचा अर्ज आयुक्तांना दिला असल्याचे सांगितले.
त्यावर ज्योती चव्हाण यांनी मी त्यांना धमक्या देणे बंद करण्यास सांगते, असे सांगितले. त्यावेळी बाळासाहेब चव्हाण यांनी १५ हजार रूपये दरमहा घरपोच आणून देण्याची जबाबदारी उचलतो, अशी आॅफर दिली. याबाबतची व्हीडीओ क्लीपही देशमुख यांनी पत्रपरिषदेत दाखविली.
दंड करायला लावायचे नाटक करा
याच व्हीडीओ क्लीपमध्ये आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील प्रभाग २९ चा ठेका चव्हाण यांचा असल्याचे निर्देशित करीत मी यांना सांगितले की, मला बोलवायचे, चार लोकांसमोर दंड करायला लावायचे, असे सांगताना दिसतात. म्हणजेच लोकांसमोर दंड करायचे नाटक करावयाचे व नंतर तो दंड रद्द करून टाकायचा, असे प्रकार सुरू असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
आयुक्त, उपायुक्तही सहभागी
आरोग्यच्या सफाई ठेक्यातील गैरव्यवहारात तत्कालीन आयुक्त तसेच विद्यमान उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील तसेच आरोग्य निरीक्षक व कर्मचाºयांनी सफाई मक्तेदारांशी हातमिळविणी केलेली आहे.
आरोग्याधिकारी एका व्हीडीओ क्लीपमध्ये आयुक्तांबद्दल ‘साहेब खुप हुशार आहेत. ते म्हणतात तुम्ही मिटींग करा व तेथेच निर्णय घ्या’ असे म्हणताना दिसतात. तर उपायुक्त कहार यांच्याशी तर आरोग्याधिकाºयांनी त्यांच्या मोबाईलवरूनच बोलणे करून दिल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यात उपायुक्तांनी देशमुख यांना ‘तुम्ही जरी पुराव्यासह तक्रारी केल्या असल्या तरी त्या तक्रारी आम्ही नाकारू शकतो. तुम्ही कशाला विरोधात जाताय? जसे चालले आहे तसेच चालू द्या, बाकी आरोग्याधिकारी तुम्हाला सांगतील, असे सांगितल्याचा दावा केला.
तसेच पत्रकार परिषद घेऊन नगरसेविका देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे सहजीवन स्वयंरोजगार संस्थेचे सदस्य आरोग्याधिकाºयांच्या घरी झालेल्या एका बैठकीत आले होते. त्यात आरोग्याधिकारी त्यांना दरमहा दहा हजार रूपये देशमुख यांना देण्याची सूचना करताना दिसतात. मात्र संबंधीतांकडून कुठेही ही रक्कम जास्त होते, असा उल्लेख नाही. याचाच अर्थ आम्ही मागणी केली नव्हती, हे स्पष्ट होते.
त्याउलट आरोग्याधिकारी त्यांना ३० हजार रूपयांनी कमी रक्कमेचा मक्ता का घेतला. मला विचारायला हवे होते.
आता दंड कमी करून प्रॉफीट वाढवून देतो, असे स्पष्टपणे सांगताना व्हीडीओ क्लीपमध्ये दिसून येत असल्याचे सांगितले.
अधिकारी, कर्मचाºयांच्या निलंबनाची मागणी
या घोटाळ्यात तत्कालीन आयुक्तांसह उपायुक्त, आरोग्याधिकारी व कर्मचाºयांचा सहभाग असून आयुक्त सेवानिवृत्त झाल्याने त्यांचे निवृत्तीवेतन रोखावे व अन्य अधिकाºयांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी देशमुख यांनी केली. तसेच प्रभाग ३६ चा सफाई मक्ता रद्द करण्याची मागणी केली.
८० हजाराऐवजी जेमतेम ४-५ हजाराचा दंड
प्रभाग ३६ मधील सफाईबाबत ३५०० तक्रारी केल्या होत्या. प्रशासनाच्या टिपणीतच प्रभाग ३६ चा मक्ता रद्द करण्याची कारणे देताना ओला व सुका कचरा स्वतंत्र गोळा न करणे तसेच इतर बाबींचा उल्लेख केलेला आहे. करारनाम्यात नमूद केल्यानुसार त्यासाठी दरमहा किमान ८० हजार रूपये दंड होणे अपेक्षित असताना किरकोळ दंड केला आहे. देशमुख यांनी केलेल्या ३५०० तक्रारींपैकी १५०० तक्रारी गायब करून टाकल्या. तरीही उर्वरीत तक्रारींपोटी किमान ७-८ लाखांचा दंड करणे अपेक्षित असताना तसे घडलेले नसल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.