४५ कोटींचा रस्त्यांचा ठराव रद्द करून नव्याने ७० कोटींचा ठराव होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:10 AM2021-02-19T04:10:06+5:302021-02-19T04:10:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अंत्यत खराब झाली असून, आता सत्ताधाऱ्यांविरोधात जनमानसांत संतापाची लाट आहे. त्यामुळे ...

45 crore road resolution will be canceled and a new resolution of 70 crore will be made | ४५ कोटींचा रस्त्यांचा ठराव रद्द करून नव्याने ७० कोटींचा ठराव होणार

४५ कोटींचा रस्त्यांचा ठराव रद्द करून नव्याने ७० कोटींचा ठराव होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अंत्यत खराब झाली असून, आता सत्ताधाऱ्यांविरोधात जनमानसांत संतापाची लाट आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून रस्त्यांचे काम प्राधान्याने घेण्यात यावे यासाठी खलबतं सुरू झाली आहे. सप्टेंबर महिन्यात ४५ कोटींच्या मनपा फंडातून शहरातील रस्त्यांच्या होणाऱ्या कामाचे अंदाजपत्रक रद्द करून, आता नव्याने २५ कोटींची भर टाकून ७० कोटींच्या कामांचे नवीन अंदाजपत्रक आता तयार केले जाणार आहे.

अमृत योजनेतंर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची कामे रखडली होती. त्यातच मनपाकडून रस्त्यांची थातूर-मातूर दुरूस्ती केली जात असल्याने रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. अशा परिस्थितीत आता अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे तर भुयारी गटार योजनेचे कामदेखील वेगात सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे सुरू करण्याचा मार्ग जवळपास मार्गी लागणार आहेत.

एकाच रस्त्यांचे अनेक निधीतून प्रस्ताव

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी रस्त्यांचे प्रस्ताव तयार करताना, एकाच रस्त्याचे प्रस्ताव नगरोत्थांतर्गत निधीतून व मनपा फंडातील निधीतून देखील केले आहेत. त्यामुळे ४५ कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामांचे प्रस्ताव जे नगरोत्थांतर्गत होणाऱ्या कामात आहेत. ते प्रस्ताव आता कमी केले जाणार आहे. त्यातच मनपा फंडातील ४५ कोटींच्या कामांमध्ये २५ कोटींचा निधीची वाढ करून, एकूण ७० कोटींच्या रस्त्यांचा कामांचा प्रस्ताव येत्या महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे तसेच सप्टेंबर महिन्यात झालेला ३१५ क्रमांकांचा ठरावदेखील रद्द करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे.

४२ कोटींसाठी नव्याने अंदाजपत्रक तयार होणार

नगरोत्थान अंतर्गत मनपाला प्राप्त झालेल्या मात्र सध्य:स्थितीत नगरविकास मंत्रालयाने स्थगिती दिलेल्या ४२ कोटींच्या निधीबाबतदेखील अद्याप बैठक झालेली नाही. त्यामुळे हा निधी मिळण्याचा मार्ग अजून खडतर झाला आहे. दरम्यान, या निधीतून कामांसाठी करण्यात आलेले अंदाजपत्रक नव्याने करण्याबाबत मनपा स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात २ कोटींची कामे देण्याबाबत शिवसेना नगरसेवक आक्रमक आहेत. याबाबत नगरविकास मंत्रालयाकडे देखील काही नगरसेवकांनी तक्रारी केल्या असून, या निधीबाबत नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याची मागणी केली आहे.

निधीचे ठराव कोट्यवधीचे अंमलबजावणी मात्र कधी

शहरातील खराब रस्त्यांमुळे जळगावकर अक्षरश त्रस्त झाले आहेत. मनपातील सत्ताधारी जळगावकरांना सेवा देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यातच अडीच वर्षांच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून १०० कोटी, ४५ कोटी अशा कोट्यवधीच्या निधीतून होणाऱ्या कामांचे ठराव केले जात आहेत. मात्र, अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. त्यामुळे जळगावकरांना या कोट्यवधींच्या घोषणांचीही चीड येत आहे. आता ‘अमृत’चे काम अनेक भागांत पूर्ण झाले आहे. या भागात तरी रस्त्यांची कामे करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: 45 crore road resolution will be canceled and a new resolution of 70 crore will be made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.