रायपूरच्या दाम्पत्यास ४५ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:13 AM2019-02-02T11:13:09+5:302019-02-02T11:14:20+5:30
दोन महिलांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव : कौशल्य विकास योजनेत सुरु केलेल्या प्रशिक्षण संस्थेचा खोटा ठराव करून आणि संस्था परस्पर स्वत:च्या नावावर करून रायपूरच्या दाम्पत्याची ४५ लाखात फसवूणक केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी निमजाई फाऊंडेशनचे भूषण बक्षे, त्यांची पत्नी व अन्य चार अशा सहा जणांविरुद्ध शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला.
भारती गजेंद्रसिंग परदेशी (३६ रा. रायपूर ता. जळगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली.
भारती परदेशी यांनी २०१५ मध्ये कौशल्य विकास योजनेतंर्गत महाबळ कॉलनी परिसरातील मॅजिक वर्ल्ड आॅफ एज्युकेशन प्रशिक्षण केंद्रात अॅनिमेशनचा क्लास लावला होता. यादरम्यान केंद्राचे मालक भूषण बक्षे याने भारती यांचे पती गजेंद्रसिंग परदेशी यांच्याशी परिचय करून घेतला आणि परदेशी यांनाही प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याबाबत माहिती दिली. यानंतर मयुरेश्वर स्कूल आॅफ कॉम्प्युटर एज्युकेशन नावाने रायपूर येथे प्रशिक्षण केंद्राची नोंदणी त्यांनी करून दिली.
परदेशी यांचे मित्र अमित राजूसिंग चव्हाण यांना पिंप्राळा येथे दुसरे केंद्र सुरु करावयाचे असल्याने त्यासाठी बक्षे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी परदेशी यांचे मयुरेश्वर नावाचे प्रशिक्षण केंद्र बक्षे याने गणेश कॉलनी येथे परस्पर स्थलांतरीत केल्याचे समोर आले. याबाबत परदेशींनी विचारला असता ते माझ्या मालकीचे असून तुमचा काहीएक संबंध नसल्याचे बक्षेने उत्तर दिले. परदेशी यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मिळविली असता आपली फसवणूक झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी वरील सहा जणांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६७, ४७१, ४७४,१२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
खोटे शपथपत्र केले तयार
भूषण बक्षे याने खोटे शपथपत्र शासनाला सादर केले तसेच संस्थेची बनावट कागदपत्रे बनावट स्वाक्षरी शिक्क्याच्या आधारावर तयार करुन त्याने परदेशी यांचे मयुरेश्वर स्कूल आॅफ कॉम्प्युटर एज्युकेशन केंद्र परस्पर त्याची पत्नी शितल भगवान पाटील या अध्यक्ष असलेल्या निमजाई फाऊंडेशनच्या नावे लावले. यात स्वत: खाते क्रमांक व मोबाईल क्रमांक देवून बक्षे, शीतल पाटील यांच्यासह निमजाई फाऊंडेशनचे सदस्य भारत अरविंद भंगाळे, मोहिनी भरत भंगाळे, भगवान दगडू पाटील, राजेश नरेंद्र नारखेडे यांनी खोटा ठराव करुन अनुदानाची ४५ लाखांची रक्कम परस्पर खात्यावर जमा करुन घेतली.
अनेकांना फसविल्याचा संशय !
एरंडोल येथील प्रविण महाजन, धरणगाव येथील दीपक रतन पवार, सावखेडा बुद्रूक येथील अमित राजूसिंग चव्हाण यांच्यासह इतरांची फसवूणक झाल्याची माहिती फिर्यादी भारती परदेशी यांनी पोलिसांना दिली.