जळगावातील वैद्यकीय संकुलासाठी ४५८ कोटींचे अंदाजपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 07:37 PM2018-11-10T19:37:17+5:302018-11-10T19:38:09+5:30
सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया
जळगाव : चिंचोली शिवारात प्रस्तावित वैद्यकीय संकुलाच्या (‘मेडिकल हब’) पहिल्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ५०० खाटांच्या रूग्णालयासह चार कामांसाठी ४५८ कोटी ८५ लाख ८९ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयात असून त्यास शासनाने मंजुरीदेखील दिली आहे. हे बांधकाम शासनाच्या १० मे २०१८च्या परिपत्रकानुसार ‘टर्न की’ तत्वाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधून घेतले जाणार आहे. या कामांसाठी बांधकाम सल्लाहार नेमण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे २४ आॅक्टोबर रोजी निविदा देखील काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयाये आणि रुग्णालयांचे बांधकाम आता केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील सार्वजनिक कंपन्यांकडून करुन घेता येणार असल्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. यामध्ये २५ कोटी व त्या पेक्षा जास्त अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामांचाही समावेश राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने माहिती घेतली असता मुळातच हे काम ४५८ कोटींच्यावर असल्याने ही कामे मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार होणार असल्याचे सांगितले जात आहे.
चिंचोली शिवारात प्रस्तावित वैद्यकीय संकुलाच्या (‘मेडिकल हब’) चा हा प्रकल्प सुमारे ८०० कोटींचा असून त्यासाठी १०० एकर जागा संपादित करण्यात आली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ५०० खाटांचे रूग्णालय, मुले, मुली, परिचारिका वसतीगृह व डॉक्टर, कर्मचारी निवासस्थाने अशा इमारतींचे काम प्रस्तावित आहे. तर पुढील टप्प्यांमध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व १०० खाटांचे रूग्णालय, शासकीय होमिओपॅथीक महाविद्यालय या कामांचा समावेश आहे.
यासाठी ४५८ कोटी ८५ लाख ८९ हजार रुपयांचे दोन वेगवेगळे अंदाजपत्रक असून २६६ कोटी ९५ लाख ६५ हजार रुपयांच्या अंदाजपत्राच्या कामांमध्ये महाविद्यालय, प्रशासकीय इमारत, निवासस्थाने, वसतिगृह या कामांचा समावेश आहे. तसेच १९१ कोटी ९० लाख २४ हजार रुपयांच्या अंदाजपत्रातील कामांमध्ये रुग्णालयाची इमारत उभा राहणार आहे.
या शासकीय वैद्यकीय संकुलाची इमारत उभारणीसाठी बांधकाम सल्लागार नेमण्याची प्रक्रियादेखील सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण सा.बां. विभागाकडून इ-टेंडरिंग प्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चिंचोली शिवारात वैद्यकीय संकुल उभारणीसाठी सल्लागार नेमणूक प्रक्रिया सुरू आहे. तसेच वैद्यकीय संकुलाचे बांधकाम शासकीय परिपत्रकानुसार ठरवून दिलेल्या संस्थेकडून होणार आहे.
- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता