लासुर गावाला ४७ लाखाची पाणी योजना मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 06:04 PM2019-05-31T18:04:42+5:302019-05-31T18:05:12+5:30
ग्रामस्थांमध्ये समाधान
चोपडा : टंचाई काळात लासुर ता. चोपडा येथे ४७ लाखाची तातडीची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. ही योजना तात्काळ प्रभावाने लागू होणार असून १५ जून पर्यंत गावात पाणी पोहचणार असल्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील ज्या गावांना पाणी टंचाई आहे त्या गावांना नवीन विंधन विहिरी, तात्काळ नळपाणी योजना मंजुरीसाठी पाठविल्या होत्या. त्यात तालुक्यातील सुमारे २० हजार लोकवस्ती असलेल्या लासुर गावासाठी ४७ लाखाच्या योजनेस आयुक्तांनी तांत्रिक मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र प्राप्त झाले असून त्याची इटेंडर प्रोसेस सुरू झाली आहे. सदर पाणी योजनेसाठी अनेर बांधाच्या मागील बाजूस मराठे गावाजवळ दोन कुपनलिका करण्यात आल्या आहेत. पाच किलोमीटर वरून पाणी गावात पोहचणार असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधन व्यक्त होत आहे.