१५ वर्ष वयोगटापर्यंत तीनच महिन्यात ४७०० बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:50+5:302021-05-29T04:13:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हा परिणाम हा पहिल्या लाटेच्या तुलनेत तरूण, लहान मुले यांच्यामध्ये अधिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हा परिणाम हा पहिल्या लाटेच्या तुलनेत तरूण, लहान मुले यांच्यामध्ये अधिक जाणवला आहे. १५ फेब्रुवारीपासून गेल्या तीन महिन्यातच १५ वर्षाखालील ४७०० मुले कोरोना बाधित झालेली आहेत. पहिल्या लाटेत पूर्ण दहा महिन्यातही इतकी मुलांना लागण झालेली नव्हती, त्यामुळे तिसऱ्या लाटेत याच वयोगटात अधिक बाधितांचे प्रमाण असू शकते, असे तज्ञ सांगत आहेत.
कोरानाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवर होईल, अशी शक्यता आधीच वर्तविण्यात आली आहे. त्या दृष्टीने सर्वच पातळ्यांवर नियेाजन सुरू करण्यात आले आहे. त्या दृष्टीने आढावाही घेतला जात आहे. पहिल्या लाटेत वृद्ध व ज्यांना अन्य व्याधी होत्या अशा रुग्णांमध्ये कोरेानाचे प्रमाण अधिक होते, याच परिस्थितीत मृत्यूही होत होते. मात्र, दुसऱ्या लाटेत सर्वच अंदाज फोल ठरत, तरूण, धडधाकड, तंदुरूस्त व्यक्तिही कोरोनाच्या बळी ठरल्या आहेत. त्यामुळे हा विषाणू सर्वच वयाेगटांवर परिणाम करणार असून दुसऱ्या लाटेत तर तरूणांचे गंभीर होण्याचे प्रमाण मध्यंतरी प्रचंड वाढले होते.
असे आहे चित्र
१५ फेब्रुवारीपर्यंत १५ वर्षाखालील बाधित : ३८७२
१५ फेब्रुवारीनंतर १५ वर्षाखालील बाधित : ४७०४
एकूण बाधित : ८५७६
जीएमसीत शंभर बेडचे नियेाजन
आगामी तिसऱ्या लाटेसाठी लहान मुलांसाठी दहा स्वतंत्र व्हेंटीलेटर्स तसेच शंभर बेडचे नियोजन राहणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवजात शिशू काळजी कक्ष विभागात सद्याच्या घडीला १८ बेड असून आयसीयू दहा बेड असे २८ बेड आहेत. वरच्या कक्षांमध्ये सर्वत्रच ऑक्सिजन पाईपलाईन असल्याने शक्य तेवढे बेड रुग्णानुसार वाढविता येतील, असे शंभर बेडचे नियेाजन असल्याचे सांगितले जात आहे.