मेगाब्लॉकमुळे मुंबईकडून येणाऱ्या गाड्याना ५ ते ६ तास विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:16 AM2021-05-20T04:16:43+5:302021-05-20T04:16:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कल्याण रेल्वे स्टेशन जवळील खडावली आणि अटगाव दरम्यान मंगळवारी मध्यरात्री घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कल्याण रेल्वे स्टेशन जवळील खडावली आणि अटगाव दरम्यान मंगळवारी मध्यरात्री घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे याचा मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर चांगलच परिणाम झाला. मुंबईकडून येणाऱ्या अनेक सुपरफास्ट गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावल्यामुळे प्रवाशांना जळगाव स्टेशनवरच ताटकळत बसावे लागले. तसेच दुसरीकडे मंगळवारी रात्रीचा मुंबईकडे जाणारा विदर्भ एक्स्प्रेसही दोन तास उशिरा धावल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झालेली दिसून आली.
रेल्वे प्रशासनातर्फे या ठिकाणी गर्डर टाकण्याच्या कामासाठी बुधवारी मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मध्यरात्रीचा हा ब्लॉक असल्याने मुंबईहुन जळगावकडे येणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, पंजाब मेल व महानगरी एक्स्प्रेस या सर्व सुपरफास्ट गाड्या रात्री बाराच्या आत मुंबई येथून वेळापत्रकाप्रमाणे निघणे आवश्यक होते. मात्र, मेगाब्लॉक मुळे या सर्व गाड्या कल्याण स्टेशनच्या अलीकडे रखडल्या. मेगाब्लॉकचे काम संपल्यानंतरच या गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे पर्यायाने जळगावला पहाटेच्या वेळी येणाऱ्या या गाड्या बुधवारी दुपारी जळगाव मध्ये दाखल झाल्या.
इन्फो :
मुंबईकडून येणाऱ्या या गाड्या आल्या विलंबाने
मेगाब्लॉकमुळे मुंबईकडून येणाऱ्या तीन सुपरफास्ट गाड्या लेट झाल्या. यामध्ये (गाडी क्रमांक ०२१९३) महानगरी एक्स्प्रेस ही गाडी साडे पाच तास विलंबाने धावली. या गाडीची जळगावला येण्याची वेळ सकाळी साडे सहाची असतांना,ती दुपारी साडेबारा वाजता जळगाव स्टेशनावर आली. तसेच (गाडी क्रमांक ०२५३८) कुशीनगर एक्स्प्रेस या गाडीची जळगावला येण्याची वेळ सकाळी साडे सात वाजेची असतांना, ही गाडी दुपारी एक वाजता जळगावला आली. तर (गाडी क्रमांक ०२१४१) पाटली पुत्र एक्स्प्रेस या गाडीची जळगावला येण्याची वेळ सकाळी पावणे सहाची असतांना, ही गाडी दुपारी बारा वाजता जळगावात आली. तब्बल सहा तास ही गाडी लेट धावली.
इन्फो :
विदर्भ एक्स्प्रेसही खोळंबला
या कामामुळे मंगळवारी रात्री मुंबईकडे जाणारी हावडा एक्स्प्रेस पश्चिम रेल्वे मार्गे मुंबईकडे रवाना करण्यात आल्यानंतर विदर्भ एक्स्प्रेस मात्र दोन तास विलंबाने मुंबईकडे रवाना करण्यात आली. जळगावला ही गाडी तिच्या वेळेनुसार रात्री पावणे बारा वाजता न येता, मध्यरात्री अडीच वाजता आल्यामुळे प्रवाशांना स्टेशनवरच ताटकळत बसावे लागले. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.