बनावट कोटेशनद्वारे लाटले ५ कोटी ४२ लाखाचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:30 AM2019-01-30T11:30:40+5:302019-01-30T11:32:13+5:30
गुन्हा दाखल
जळगाव : बांधकाम व्यवसायासाठी कर्ज घेताना बनावट कोटेशन सादर करुन पंजाब नॅशनल बॅँकेकडून ५ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बॅँकेच्या दोन अधिकाऱ्यांसह आठ जणांविरुध्द मंगळवारी शहर पोलीस स्टेशनला फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सोहन उमाकांत नेहते, जयेश उमाकांत नेहते (रा.गणेशवाडी, जळगाव) व उत्तम तुळशीराम चौधरी (रा.गुरुकुल कॉलनी, जळगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कमल खेमचंद चौधरी, लिना जयेश नेहते, शैला उमाकांत नेहते व सोहन उमाकांत नेहते यांनी २०१७ व २०१८ या कालावधीत बांधकामासाठी लागणारे यंत्रे, उपकरणे खरेदीसाठी बनावट कोटेशन सादर करुन पंजाब नॅशनल बॅँकेतून(नवी पेठ शाखा) ५ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज घेतले. प्रत्यक्षात त्यांनी कोणतेच यंत्रे किंवा उपकरणे खरेदी न करता ती रक्कम स्वत:च्याच कामासाठी वापर केली. सुनील मनोहर चौधरी या बॅँकेच्या अधिकाºयाने केलेल्या चौकशीत हे गौडबंगाल उघड झाले. उत्तमकुमार मधुमंगल गरतीया (वय ३१, रा.गणेशवाडी, जळगाव मुळ रा.भवनी पटना, ता.जि.कलाहांडी, ओरिसा) यांनी मंगळवारी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार आठ जणांविरुध्द फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
शांती कन्स्ट्रक्शन व रेन बॅक्सी इन्फ्रा फर्म
नेहते परिवाराचे रेन बॅक्सी इन्फ्रा नावाने तर चौधरी यांचे शांती कन्स्ट्रक्शन नावाने बांधकाम फर्म आहे. या फर्मच्या व्यवसायासाठीच यंत्र खरेदी करण्याच्या नावाखाली त्यांनी हे ५ कोटी ४२ लाखाचे कर्ज घेतले.अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव, सहायक निरीक्षक विजय देशमुख, सहायक फौजदार रमेश सूर्यवंशी, हेडकॉन्स्टेबल प्रवीण जगताप, जीवन पाटील, दिलीप चव्हाण, सुभाष शिंदे व हितेंद्र अहिरकर यांच्या पथकाने सोहन, जयेश या दोन्ही भावंडासह उत्तम चौधरी या तिघांना अटक केली.
बॅँकेच्या अधिकाºयांनी केली मदत
या प्रकरणात कमल चौधरी, लीना नेहते, शैला नेहते व सोहन नेहते यांनी कर्ज घेताना वेगवेगळ्या कंपन्यांचे कोटेशन तयार करुन कोटेशन देणाºया कंपनीच्या नावाने जयेश नेहते व उत्तम चौधरी यांचे नाव लावून वेगवेगळ्या बॅँकेत बनावट खाते उघडले व स्वत:च्या नावावर डीडी (मूल्यांकन रोखा) व आरटीजीएस केलेली रक्कम स्वत:च्या नावावर घेतली. या कामात बॅँकेचे तत्कालीन मुख्य प्रबंधक अरुण आर्या व संजय लोणारे यांनी मदत केली.
यांच्याविरुध्द दाखल झाला गुन्हा
कमल खेमचंद चौधरी, लीना जयेश नेहते, शैला उमाकांत नेहते, सोहन उमाकांत नेहते, जयेश उमाकांत नेहते, उत्तम तुळशीराम चौधरी, बॅँकेचे तत्कालीन मुख्य प्रबंधक अरुण आर्या व संजय सिताराम लोणारे यांच्याविरुध्द कलम ४२०, ४०९, ४६५, ४६७, ४६८, ४७१ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सोहन नेहते, जयेश नेहते व उत्तम चौधरी या तिघांना सायंकाळी अटक करण्यात आली.