२४ तासात ५ बाधित, कोरानाच्या १३ महिन्यातील निच्चांकी रुग्णसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:40+5:302021-07-05T04:12:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरला असून रविवारी कोरोना काळातील १३ महिने व १० दिवसांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरला असून रविवारी कोरोना काळातील १३ महिने व १० दिवसांची निच्चांकी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात यापूर्वी २३ मे २०२० रोजी कोरोना काळात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नव्हता. त्यानंतरची ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. दरम्यान, रविवारी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये एकही बाधित आढळून आलेला नाही, जळगाव शहर व जामनेर या दोनच ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत.
१५ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली. मार्च व एप्रिल महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. मे महिन्यापासून रुग्णवाढीचा आलेख घसरायला सुरूवात झाली आहे. आता आणखी कमी झाला आहे. रविवारी आरटीपीसीआरच्या १९१८ चाचण्या झाल्या असून त्यात ४ बाधित आढळून आले आहेत. तर १२२२ ॲन्टीजन चाचण्यांमध्ये केवळ एक रुग्ण समोर आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील १ बाधित महिलेच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
शहरात सक्रिय रुग्ण ५०च्या खाली
शहरात रविवारी २ बाधित आढळून आले आहेत. तर ४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात एकही मृत्यू नाही. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या घटून ४९ वर आली आहे. भडगावात सर्वात कमी ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दोन्ही लाटांमधील दिलासादायक दिवस असे..
१५ मे २०२०- ०५
२२ मे २०२०- ००
२६ जानेवारी २०२१ - ११
६ फेबुवारी २०२१ - १७
३ जुलै २०२१- १५
४ जुलै २०२१ - ०५
जीएमसीत २२ रुग्ण
सर्वत्र रुग्णसंख्या घटत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मध्यंतरी रोज किमान तीस ते चाळीस रुग्ण दाखल होत होते, हीच संख्या आता एक दोन वर आली आहे. या ठिकाणी २२ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील ६ रुग्ण व्हेंटीलेटरवर तर १० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दोनही लाटांमधील ही संख्याही सर्वात कमी आहे.