स्वस्त धान्य दुकानावरून मिळणार 5 किलो वजनाचे सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 01:12 PM2017-09-17T13:12:11+5:302017-09-17T13:12:56+5:30
दुकानदारांच्या नफ्यात वाढ : जिल्ह्यात 1921 स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशिनचे वाटप
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 17 - राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात 1921 स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशिन वाटप करण्यात आले असून त्यास दुकानदारांचाही चांगला प्रतिसाद लाभत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. धान्यासह आता हे दुकानदार 5 किलो वजनाचे 20 गॅस सिलिंडर विक्री करू शकतील, अशीही माहिती जाधव यांनी दिली.
ई-पॉस मशिनद्वारे धान्याचा काळा बाजारास आळा बसण्यास मदत होणार असल्याने सर्वत्र याचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार जुलै महिन्यात 2 लाख 63 हजार कार्ड धारकांना तर ऑगस्ट महिन्यात 3 लाख 54 हजार कार्ड धारकांना ई-पॉस मशिनद्वारे धान्य वाटप झाले. सप्टेंबर महिन्यात साडेचार ते पाच लाख कार्ड धारकांना ई-पॉसद्वारे धान्य वाटप करण्याचे उद्दीष्ट असल्याची माहिती जाधव यांनी दिली. पारोळा तालुक्यात 92 टक्के तर रावेर तालुक्यात 90 टक्के धान्य वाटप ई-पॉस मशिनद्वारे झाले असल्याचेही ते म्हणाले.
नफ्यामध्ये वाढ
रेशन दुकानदारांच्या नफ्यामध्ये (कमिशन) 70 रूपयांवरून 150 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. सोबतच हे दुकानदान मान्यताप्राप्त बियाण्यांची विक्रीही या दुकानात करू शकतील. सोबतच विनाअनुदानीत कितीही प्रमाणात रॉकेलची विक्री करू शकतील. या रॉकेलचे दर 40 ते 45 रुपये प्रति लिटर राहतील, असे सांगण्यात आले.
साखरेत कपात
पूर्वी बीपीएल (दारिद्र रेषेखालील कुटुंब) व अंत्योदय या रेशन कार्ड धारकांना प्रती व्यक्ती पाचशे ग्रॅम साखर मिळत होती. आता शासनाने ‘बीपीएल’ची साखर बंद केली आहे. दोन्ही योजनेतंर्गत 6 हजार 301 क्विंटल साखरेचे नियतन शासनाकडून येत होते. आता केवळ अंत्योदय योजेनेतील कार्ड धारकांना प्रती कार्ड एक किलो साखर मिळेल. त्यासाठी एक हजार 375 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त झालेले आहे.
आधार संलग्न करा
शिधापत्रिकेशी आधार संलग्न करणे गरजेचे असून ते नसेल तर धान्य मिळू शकणार नाही. आपल्या कुटुंबातील प्रत्येकाचे आधारकार्ड शिधापत्रिकेशी संलग्न करा आणि ते संलग्न झाले किंवा नाही याबाबत आपल्या स्वस्त धान्य दुकानदाराशी संपर्क साधावा, असे आवाहनही जाधव यांनी केले.