राजस्थानमधील अपघातात अमळनेरचे सहाजण ठार, मृतांमध्ये दोन कुटंबातील प्रत्येकी तीन जणांचा समावेश
By संजय पाटील | Published: November 13, 2023 06:52 PM2023-11-13T18:52:33+5:302023-11-13T18:52:59+5:30
जैसलमेर येथे पर्यटनासाठी गेलेल्या अमळनेर येथील पाच जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला.
अमळनेर : जैसलमेर येथे पर्यटनासाठी गेलेल्या अमळनेर येथील सहा जणांचा रस्ता अपघातातमृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना सोमवारी दुपारी पावणेतीन वाजता राजस्थानातील बाडमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ घडली. मृतांमध्ये दोन परिवारातील प्रत्येकी तीनजणांचा समावेश आहे.
मांडळ येथील शिक्षक धनराज नगराज सोनवणे (५५, रा. बेटावद), योगेश धोंडू साळुंखे (रा. अर्थे, ता. शिरपूर, ह.मु. पिंपळे रोड, अमळनेर) आणि दिनेश सूर्यवंशी हे परिवारासह दोन चारचाकीने राजस्थानात पर्यटनासाठी जात होते.
सोमवारी दुपारी पावणेतीन वाजता बाडमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ यातील एका चारचाकीने (क्र. एमएच ०४ ९११४) कंटेनरला धडक दिली. त्यात धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा बाबुलाल मैराळे ऊर्फ सुरेखा धनराज सोनवणे (५०), त्यांची मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (५ वर्षे), गायत्री योगेश साळुंखे (३०) , त्यांचा मुलगा प्रशांत योगेश साळुंखे (७) आणि मुलगी भाग्यलक्ष्मी साळुंखे (१ वर्षे) असे सहाजण ठार झाले.
सुरेखा सोनवणे (मैराळे) या गलवाडे येथे जि.प. शाळेत शिक्षिका होत्या. गेल्याच महिन्यात त्यांची मांडळ येथे समायोजनात बदली झाली होती. या अपघातात त्या जखमी झाल्या होत्या. त्यांना पालमपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार घेताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.
सुदैवाने योगेश साळुंखे बचावले !
घटनेच्या अर्धा तास आधी दिनेश सूर्यवंशी यांनी मोबाइलवर बोलणे केले आणि योगेश साळुंखे यांना धनराज सोनवणे यांच्या वाहनातून आपल्या वाहनात बोलावून घेतले. सोनवणे यांचे वाहन पुढे चालत होते व सूर्यवंशी यांचे वाहन मागे होते. वाहन बदलवल्याने योगेश साळुंखे बचावले.
राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांशी बोलणे केले. राजस्थान येथील अशोक जैन यांचीही यासाठी मदत झाली.