जळगाव बसस्थानकातून ५ लाख ७५ हजार लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:25 PM2018-06-02T13:25:25+5:302018-06-02T13:25:25+5:30
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २ - नवीन बसस्थानकावर पाचोरा येथे जाण्यासाठी एस.टी.बसची वाट पाहत बसलेले संजय विष्णु वाणी (वय-४५, रा़सातगाव डोंगरी, ता़ पाचोरा) यांच्या हातातील ५ लाख ७५ हजार रूपये असलेले बॅग हिसकावून दुचाकीवरून दोन चोरट्यांनी धुम ठोकल्याची घटना शुक्रवारी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास घडली़
दरम्यान, हातातील अडीच लाख रूपये असलेली बॅग मात्र सुखरूप राहिली़ रात्रीच वाणी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना हकीकत सांगताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले़ त्यात दोन जण भरधाव दुचाकीवरून जात असताना दिसून आले आहे़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कापूस विक्रीची होती रक्कम
संजय वाणी हे सातगाव डोंगरी येथे कुटुंबियांसह वास्तव्य करतात़ त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे़ मागील हंगामात वाणी यांच्यासह इतर तीन भावडांनी कापसाची लागवड केली होती. ३० मे रोजी संजय वाणी व त्यांचे भाऊ सुधाकर वाणी, बाबुलाल वाणी व पुतण्या अमित शेंडे या चौघांनी शेतातून निघालेला १२० क्विटंल कापूस हा ट्रक (एमएच़१९़झेड़५०५५) मध्ये भरला़ अन् तो गुजरात राज्यातील चोटीला या गावी विक्रीसाठी ज्वाली जिनींग येथे पाठविण्यात आला़ कापूस विक्री करुन वाल्मीक पाटील हा कर्मचारी घरी आला़ दोन दिवस बँका बंद असल्यामुळे जिनींग मालकाने वाल्मीक यास कापूस विक्रीचे पैसे दिले नाही़
कापसाचे पैसे घेतले जोशीपेठेतून
संजय वाणी यांनी कापसाचे पैसे हे रोख स्वरुपात जळगाव येथे पाठविण्यात यावे अशी विनंती जिनींग मालकास केली़ त्यानुसार शुक्रवारी शहरातील जोशी पेठेतील रजनीकांत शेठ (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी कापसाचे पैसे आले आहेत तुम्ही घेऊन जा असे संजय वाणी यांना संपर्क करून सांगितले़ त्यानुसार पैसे घेण्यासाठी वाणी हे सायंकाळी ६ वाजता जळगावात आले़ त्यानंतर रजनीकांत शेठ यांच्याकडून जाऊन त्यांनी ५ लाख ६१ हजार रूपये घेतले़ मात्र, त्यातून रजनीकांत यांनी त्यांचे कमीशनचे १२०० रूपये काढून उर्वरित रक्कम त्यांना दिली़
चोरटे पैसे घेऊन पसार होताच वाणी यांनी क्षणाचा विलंब न करता जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले़ बसस्थानकावर घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती दिली़ दरम्यान, रात्री उशिरा एका संशयितास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते़ मात्र, त्याच्याकडून काही माहिती पोलिसांना मिळाली नाही़
मित्राचीही घेतली रक्कम
स्वत:च्या कापसाची रक्कम मिळाल्यानंतर गावातील मित्र शेतकरी गोविंद एकनाथ वाणी यांचे देखील पैसे जळगावातून घेणे होते़ त्यानुसार रात्री शहरातील नाथ प्लाझा येथे जाऊन त्यांनी पी़ नटवर यांच्याकडून गोविंद याचे अडीच लाख रूपये घेतले़ यानंतर एका बॅगेत अडीच तर दुसºया बॅगेत ५ लाख ६० हजार व त्यांचे स्वत:चे१५ हजार असे ५ लाख ७५ हजार रूपये घेऊन ते रेल्वेस्थानकाकडे निघाले़ मात्र, रेल्वे उशिरा असल्यामुळे रिक्षाने ते नवीन बस्थानकाकडे रवाना झाले़
अन् क्षणातच लांबविली बॅग
रात्री संजय वाणी हे नवीन बसस्थानकावर आले़ पाचोरा येथेजाण्यासाठीबस येण्यास उशिर असल्यामुळे ते बसची वाट पाहत फलाटावर बसले़ तोच रात्री साडे आठ वाजता एक तरूण त्यांच्याजवळ आला अन् क्षणातच त्याने ५ लाख ७५ हजार रूपये असलेली बॅग हिसकावत धूम ठोकली़ वाणी यांनी पाठलाग केला़ बाहेर दुचाकी घेऊन उभा असलेल्या साथीदारसोबतच चोरटा बॅग घेऊन पसार झाला़