२३ संवेदनशील मतदान केंद्रांसाठी पंचसूत्री! ‘ब्लॅक स्पॉट’वर डोळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 03:13 PM2024-03-26T15:13:59+5:302024-03-26T15:14:21+5:30
प्रतिबंधात्मक कारवाईसह उपाययोजना हाती घेण्याचे आदेश
कुंदन पाटील
जळगाव : गतकाळात निवडणुक प्रक्रियेत ‘ब्लॅक स्पॉट’ ठरलेल्या मतदान केंद्रांना सुरक्षा पुरविण्यासाठी ‘पंचसूत्री’ हाती घेतली जाणार आहे. पोलीस आणि महसुल प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीला आवर घालत ‘पंचसूत्री’च्या माध्यमातून सुरक्षा कवच निर्माण केले जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या संहितेनुसार उपाययोजना पूर्ण करण्यासाठी दि.१५ एप्रिलपर्यंत डेडलाईन दिली आहे.
‘नॉन फोर्स सिव्हिल मेझर्स’ या संकल्पनेतून ही ‘पंचसूत्री’ हाती घेतली जाणार आहे. या प्रक्रियेत पोलीस स्टेशननिहाय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. या प्रक्रियेतून मतदानाची टक्केवारी वाढ, तक्रार आणि आरोपमुक्त प्रक्रिया, दीर्घकालिन शांतता टिकविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
अशी आहे पंचसूत्री
मॅपिंग: पोलीस स्टेशन
कार्यक्षेत्राचा नकाशा उपलब्ध करुन गतकाळात अप्रिय घटना घडलेल्या ठिकाणांवर चिन्हांकित केले जाईल. या परिसरातील हिंसक जमावाकडून वापरल्या जाणाऱ्या मार्गाला चिन्हाकिंत केले जाईल. प्रथम माहिती अहवाल आणि आरोपपत्रावरून, आरोपी गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांच्या घरांवर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे.
प्रतिबंधात्मक कारवाई
आरोपी प्रवृत्तीविरोधातबॉण्ड घेण्याचा प्रस्ताव सादर करा, निवडणुक काळात क्षेत्राबाहेर जाण्यासाठी त्याला प्रवृत्त करा. तसेच आवश्यकतेनुसार एमपीडीएचा प्रस्ताव सादर करा.
भौतिक पायाभूत सुविधा
मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मुक्त संचार सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना तत्काळ हाती घ्याव्यात. मतदानाच्या दिवसासाठी, शेवटच्या ४८ तासांसाठी किंवा संपूर्ण प्रचार कालावधीसाठी उपलब्ध मनुष्यबळानुसार बंदोबस्ताची आखणी करावी.
सार्वजनिक सहभाग
शांतता समितीच्या बैठका, सक्तीच्या उपाययोजना करू, शस्त्रे जप्तीसह महिला, दुर्बल घटक आणि ज्येष्ठ मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा.
आचरण-सावधगिरी
रॅली आणि रोड शोसाठी हिंसाचाराचे संभाव्य ठिकाण टाळावे. नियंत्रणासाठी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती अनिवार्य आहे. सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नियोजनाच्या देखरेखीसाठी भेट देतील.मतदारांची ओळखीसह त्यांची पडताळणीसाठी ‘अलर्ट’ राहावे.
विधानसभा मतदारसंघनिहाय संवेदनशील मतदान केंद्र क्रमांक
दहिगाव (चोपडा), चोपडा-७० आणि ८६, अट्रावल (रावेर) २४५ आणि २४७, भुसावळ ११६, जळगाव शहर एमआयडीसी ३०७, ३५५, २६, पाळधी २४९, धरणगाव (जळगाव ग्रामीण) २१७, अमळनेर १५२ आणि १९१, एरंडोल ५०, रवंजे (एरंडोल) ७१, भडगाव १०९, वडगाव (पाचोरा) २९२, सावदा १६, ऐनपूर (मुक्ताईनगर) ५२