कारवाईच्या ढगफुटीत ५ ‘तराफे’ बुडाले! एरंडोल तहसीलदारांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 07:32 PM2023-10-03T19:32:39+5:302023-10-03T19:33:04+5:30
महसुल प्रशासनासह सरपंच, ग्रामस्थांचाही पुढाकार
कुंदन पाटील
जळगाव : एरंडोल तालुक्यातील गिरणाकाठावरुन तराफ्यांच्या सहाय्याने वाळूचा उपसा करणाऱ्या टोळक्यांना तहसीलदारांसह सहकाऱ्यांसह सरपंच व ग्रामस्थांनी घेराव घालताच माफियांची पळापळ सुरु झाली. अधिकारी, कर्मचाऱ्यांसह काही ग्रामस्थांनी थेट पाण्यात उड्या घेत तराफ्यांचा ताबा हातात घेतला आणि उपसा केलेल्या वाळूचा गिरणा पात्रात उपस करुन तराफे जप्त केले आहेत.
गतकाळात महसुल, पोलीस प्रशासनाने जेसीबीसह डंपर, ट्रॅक्टरद्वारे यापूर्वी वाळूचा उपसा करणाऱ्यांच्या नांग्या ठेचल्या.त्यामुळे काहींनी तराफ्यांच्या मदतीने चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा सुरु केला. हा प्रकार ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकातून उघड केला. त्याची तत्काळ दखल घेत एरंडोल तहसीलदार सुचिता चव्हाण सहकाऱ्यांसह गिरणाकाठी धडकल्या. तलाठी, मंडळाधिकारी, सरपंच, ग्रामस्थांना सोबत घेत त्यांनी वाळू उपसा सुरु असलेल्या घटनास्थळी धाडी टाकल्या. तेव्हा वाळूमाफियांसह त्यांचे पंटरही पाण्यात उड्या मारत गेले आणि वाट मिळेल त्यादिशेने पळत गेले. तहसीलदारांच्या पथकाने दापोरी,खेडी,धानोरा परिसरातून उपसा केलेल्या वाळूला पुन्हा गिरणा नदीत टाकल्यानंतर पाच तराफे ताब्यात घेतले.
प्रशासन ‘गिरणा’काठी
तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी खेडी खुर्द, धानोरा, दापोरा, खेडी हद्दीतील गिरणा पात्रात धडक मोहिम राबविली. पाण्यात उतरून वाळूमाफीयांचे पाच तराफे नष्ट करण्यात आले. या कारवाईसाठी जळगाव येथील तसेच एरंडोल तालुक्यातील २० ते २५ महसूल अधिकाऱ्यांसह पथक सरसावले होते.नायब तहसीलदार दिलीप पाटील, नायब तहसलदार किशोर माळी, मंडळ अधिकारी मनोज शिंपी, ,मानकुंबडे, तलाठी सुरेश कटारे, नितीन पाटील,खेडी खुर्द ग्रामपंचायतचे माजी सरपंच सतीश सोनवणे, सरपंच पती नारायण सोनवणे, किशोर सोनवणे, प्रकाश कोळी, गणेश शिंदे, सुरेश सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, साहेबराव कोळी, सोमा कोळी, पन्नालाल सोनवणे यांच्यासह ग्रामस्थांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.