सोशल मीडियावर ‘इसीस’चे 5 हजार एजंट- अब्दुल अंजारिया
By admin | Published: January 15, 2017 12:39 AM2017-01-15T00:39:41+5:302017-01-15T00:39:41+5:30
जळगाव : फेसबुक, व्हॉट्सअॅप, टि¦टर या सारख्या सोशल मीडियावर इसीसचे 5 हजार एजंट कार्यरत आहेत.
जळगाव : फेसबुक, व्हॉट्सअॅप, टि¦टर या सारख्या सोशल मीडियावर इसीसचे 5 हजार एजंट कार्यरत आहेत. या साईटसवर मुलांचे अकाऊंट असेल तर समोरुन मुलीचा बनावट चेहरा दाखवून तुमच्याशी मैत्री केली जाते व त्यानंतर मुलांना संदेश पाठविले जातात. या संदेशला चुकून लाईक केले किंवा तुमचा मोबाईल क्रमांक दिला गेला तर तुम्ही अडचणीत याल, त्यामुळे अशा संदेशला लाईक करु नका असे आवाहन कौन्सील ऑफ जामा मशिद (दिल्ली) चे सल्लागार तथा इस्लामिक डिफेन्स सायबर सेलचे अध्यक्ष डॉ.अब्दुल रहेमान अंजारिया (मुंबई) यांनी केले आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरात जिल्हा पोलीस दलातर्फे अंजारिया यांचे शनिवारी ‘इसीस व दहशतवाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, भुसावळचे सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल व्यासपीठावर उपस्थित होते.
‘जिहाद’चा गैरअर्थ लावला
जिहादचा अनेक जणांनी गैरअर्थ लावला आहे. जिहाद मानवाच्या हक्काचे संरक्षण करण्याचे सांगते, कोणाला मारण्याचे नाही. मुसलमान हा दहशवादी होवू शकत नाही व दहशवादी हा मुसलमान असू शकत नाही. खलीफा हा संरक्षणकर्ता असतो. लोकांच्या रक्षणाची त्याची जबाबदारी असते. खलीफा हा कधीच कोणाला मारण्याचे सांगत नाही, असे अंजारिया म्हणाले.
काश्मिर भारतातच राहणार
काश्मिर हे राज्य भारतात होते, आताही आहे व भविष्यातही राहिल त्यामुळे पाकिस्तानने काश्मिरचा विचार करु नये. भारतात न्याय आहे, यापूर्वीही होता व भविष्यातही राहिल. अन्यायाच्या नावाखाली वातावरण दुषीत करणे योग्य नाही.
यावेळी अंजारिया यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाला चोपडय़ाचे उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, मुक्ताईनगरचे उपअधीक्षक शेख, पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, आत्माराम प्रधान, प्रदीप ठाकूर, प्रवीण वाडिले यांच्यासह हिंदू व मुस्लीम समाजातील प्रतिष्ठीत नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले तर उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी आभार मानले.
‘इसीस’ला लाईक करु नका
सोशल मीडियावर कार्यरत असलेले इसीसचे एजंट हे स्वत:ला डॉक्टर, अभियंता असे उच्च शिक्षित दाखवतात. त्यांचा खरा चेहरा हा वेगळाच असतो. अकाऊंटधारक मुलगा असेल तर समोरुन मुलीचा चेहरा असलेला एजंट संपर्कात येतो. आपल्या हातून चूक होण्याची ते वाट पाहत असतात. तेथे आपल्याकडून चुकून मोबाईल क्रमांक दिला गेला तर त्यांच्या 100 गृपमध्ये आपल्याला समाविष्ट केले जाते. हे गृप व संदेश धोकादायक असतात, भावना भडकाविण्याचे काम त्यांच्याकडून होते, त्यामुळे अशा संदेशला तसेच इसीसला कदापीही लाईक करु नका किंवा मोबाईल क्रमांक देवू नका. तुमच्या बाबतीत असा प्रसंग घडला असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन अंजारिया यांनी केले.