एसटी महामंडळातही कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:15 AM2021-04-06T04:15:07+5:302021-04-06T04:15:07+5:30
खबरदारी : फेऱ्या कमी झाल्यामुळे चालक-वाचकांनाही सवलत लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने ...
खबरदारी : फेऱ्या कमी झाल्यामुळे चालक-वाचकांनाही सवलत
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने सर्व सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एसटी महामंडळातही प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती करण्यात आली असून, दुसरीकडे अत्यावश्यक सेवेतील चालक- वाहकांना फेऱ्या कमी झाल्यामुळे आळीपाळीने कामावर बोलावण्यात येत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
गेल्या महिन्यापासून राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. पुन्हा गेल्या वर्षाप्रमाणे हजारोंच्या घरात रुग्ण आढळून येत आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्याचे आदेशच दिले आहेत. सध्या कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता ‘मिशन बिगीन अंतर्गत’ राज्यातील सर्व शासकीय आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे, असेही या आदेशात म्हटले आहे.
शासनाच्या या निर्णयानुसार महामंडळाच्या जळगाव विभागात सर्व प्रशासकीय विभागांमध्ये पुरुष व महिला कर्मचाऱ्यांची १ एप्रिलपासून ५० टक्के उपस्थिती करण्यात आली आहे. तसेच प्रशासकीय विभागातही ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थित अनिवार्य असेल, त्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित विभाग प्रमुखांना आदेश देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
चालक- वाहकांचीही ५० टक्के उपस्थिती
महामंडळातील चालक, वाहक, वाहतूक विभागातील कर्मचारी व तांत्रिक विभागातील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत मोडले जातात. त्यांना कुठल्याही अडचणीच्या काळात सेवा बजावण्यासाठी नित्य नियमाने यावे लागते. मात्र, आता कोरोनामुळे महामंडळाच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला असून, त्यामुळे दैनंदिन फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या अत्यावश्यक मार्गावरच फेऱ्या सुरू असून, या ठिकाणी आळीपाळीने ५० टक्केच चालक-वाहकांना कामावर बोलावून सेवा बजाविण्यात येत असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यानी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.