एसटीत ५० टक्के उपस्थितीचे होतेय पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:17 AM2021-05-08T04:17:15+5:302021-05-08T04:17:15+5:30
डमी जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये ५० टक्केच प्रवाशांना बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ...
डमी
जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये ५० टक्केच प्रवाशांना बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत महामंडळाच्या बसेसमध्ये ५० टक्के उपस्थितीचे पालन होताना दिसून आले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बाहेरून येणाऱ्या प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले असून महामंडळाच्या बसेसमध्येही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच बसमध्ये एकूण प्रवासी क्षमतेपैकी ५० टक्केच प्रवाशांची वाहतूक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ४४ आसन क्षमतेच्या बसमध्ये २२ प्रवाशांनाच बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.
'लोकमत' प्रतिनिधीने शासनाच्या या आदेशाचे बसेसमध्ये पालन होत आहे का, याची पाहणी केली असता, बसमध्ये या नियमांचे पालन होताना दिसून आले.
बसमध्ये एका बाकावर एकच प्रवासी बसविल्याचे दिसून आले. प्रवासानंतर बाहेरून आलेल्या बसला लगेच कार्यशाळेत नेवून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. एकंदरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळ प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेताना दिसून येत आहे.
प्रत्येक आगारात नियमांचे पालन
शासनाच्या सूचनेनुसार बसमध्ये ५० टक्केच प्रवासी बसविण्याचे आदेश असून या आदेशाचे जळगाव विभागातील प्रत्येक आगारात पालन करण्यात येत आहे. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे ओळखपत्र तपासूनच प्रवेश देण्यात येत आहे. तसेच प्रवाशांना मास्क व सोशल डिस्टनिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच बसमध्ये प्रवेश देण्यात येत आहे.
सध्या संचारबंदी असली तरी आरोग्य सेवेतील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत मोडतात. त्यामुळे मला बसमध्ये ओळखपत्र दाखविल्यावर प्रवेश मिळतो. सध्या मी जामनेरहून नियिमत बसने जळगावला येत आहे.
- प्रवीण देसले, कर्मचारी
मी एका औषध कंपनीत कामाला आहे. मेडिकल व्यावसायिकांना औषधे देण्यासाठी दररोज जिल्ह्यात कुठेही जावे लागते. खासगी प्रवासी गाड्या बंद असल्याने बसनेच प्रवास करतो. ओळखपत्र दाखविल्यावर बसमध्ये प्रवेश देण्यात येतो, अन्यथा देण्यात येत नाही.
- सुनील पाखले, कर्मचारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार बसमध्ये ५० टक्के प्रवाशांनाच प्रवेश देण्यात येत आहे. बाहेरून आल्यानंतर बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. प्रवाशांनाही मास्क व सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
- भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग
जिल्ह्यातील एकूण आगार - ११
वाहक - १ हजार ५५०
चालक- १ हजार ४५०
यांत्रिक कर्मचारी -९००
प्रशासकीय कर्मचारी -६००
अधिकारी - २५