जळगावकरांच्या दिमतीला येणार ५० ई-बस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2023 06:54 PM2023-09-14T18:54:11+5:302023-09-14T18:54:18+5:30
महानगरपालिकेच्यावतीने शहरालगतच्या २० किलोमीटर अंतरात सेवा देण्यासाठी ई-बस सेवा सुरु करण्यात येणार आहे.
कुंदन पाटील
जळगाव : महानगरपालिकेच्यावतीने शहरालगतच्या २० किलोमीटर अंतरात सेवा देण्यासाठी ई-बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्याठी पीएम बससेवा योजनेंतर्गत ५० बसगाड्या मनपाला मिळणार आहेत. बसस्थानकासाठी मनपाने जागेची मागणी केल्यानंतर गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या बसस्थानकासह अन्य पर्यायी जागांची माहिती जाणून घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काही जागांची पाहणीही केली.
शहरात महापालिकेच्यावतीने बससेवा सुरु करण्याच्या प्रस्तावाला दि.२३ ऑगस्ट रोजी झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. त्यापार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दि.१ सप्टेंबर रोजी एक पत्र दिले. पीए योजनेंतर्गत ५० बसेस जळगावात दाखल होणार आहेत. या बसेसच्या थांब्यासाठी, देखभालीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या बसस्थानक, छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल परिसर, सामाजिक न्याय भवनासह अन्य जागांची पाहणी केली.
जागेसाठी शोधमोहिम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, महसुल विभागाचे तहसीलदार पंकज लोखंडे यांनी शहरातील जागांसंदर्भात चर्चा केली. त्यानुसार सद्यस्थितीला चार जागांवर प्रशासन विचार करीत आहे.
या जागांचा विचार
- १) महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार जुने बसस्थानकाची जागा योग्य राहील. ही जागा ताब्यात घेतल्यास बससेवेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपालाही सोयीस्कर पडणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीही या जागेला प्राधान्य दिले आहे.
- २) छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुलाभोवती असलेल्या जागेचाही जिल्हा प्रशासन विचार करीत आहे.
- ३)अजिंठा चौफुल परिसरातील एस.टी.महामंडळाच्या जागेवर वाहनतळासाठी मोठी जागा आहे. रात्रीतून बसेस त्याठिकाणी मुक्कामी थांबवायच्या आणि सेवा देण्यासाठी जुन्या बसस्थानकाच्या जागेचा वापर करायचा, असेही जिल्हा प्रशासनाचे मत आहे.
- ४) मनपाच्या हद्दीत खुला भूखंड असल्यास त्याचा शोध घ्यायचा आणि तो सोयीस्कर असल्यास त्याठिकाणाहून बससेवा सुरु करायची, असाही एक प्रस्ताव प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवला आहे.