५० टक्के कर्मचारी उपस्थिती नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:16 AM2021-03-25T04:16:09+5:302021-03-25T04:16:09+5:30

डमी मार्च एण्डमुळे कार्यालयांमध्ये ८० ते १०० टक्के हजेरी : आदेशाची अंमलबजावणी केवळ नावालाच रिॲलिटी चेक लोकमत न्यूज नेटवर्क ...

50% employee attendance in name only | ५० टक्के कर्मचारी उपस्थिती नावालाच

५० टक्के कर्मचारी उपस्थिती नावालाच

Next

डमी

मार्च एण्डमुळे कार्यालयांमध्ये ८० ते १०० टक्के हजेरी : आदेशाची अंमलबजावणी केवळ नावालाच

रिॲलिटी चेक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे, त्याला आळा घालण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून सरकारी व निमसरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा अध्यादेश काढण्यात आलेला आहे, परंतु हा आदेश नावालाच असून, त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या पाहणीत आढळून आले. लोकमत प्रतिनिधीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद या तीन प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये पाहणी केली असता, तेथे कर्मचाऱ्यांची ८० ते १०० टक्के उपस्थिती आढळून आली.

मार्च एण्डमुळे या तीनही कार्यालयांमध्ये सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह बाहेरून कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद येथे प्रवेशद्वाराजवळच बाहेरुन येणाऱ्यांची नावनोंदणी करण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, हा कर्मचारीही नावालाच बसल्याचे जाणवले. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत महिला तर जिल्हाधिकारी कार्यालयात पुरुष कर्मचारी होता. मोजक्याच लोकांची नोंदणी त्यांच्याकडून केली जात होती. एकीकडे गर्दी कमी करण्याचे शासन आदेश काढत असताना, दुसरीकडे शासनाचे प्रतिनिधी असलेले अधिकारी, कर्मचारी त्याची अंमलबजावणी करत नसल्याचे दिसून आले.

बाहेरून येणाऱ्यांचीही मोठी गर्दी

महानगरपालिकेच्या घरपट्टी विभागात घरपट्टी भरण्यासाठी बाहेरून मोठ्या प्रमाणात नागरिक येत होते. जिल्हा परिषदेतही ग्रामीण भागातून नागरिक आपले कामे घेऊन आलेले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातही अशीच परिस्थिती होती. सामान्य नागरिक आपल्या कामांसाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवताना दिसून आले, एक मात्र प्रकर्षाने जाणवले की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिकांकडून मास्क किंवा सॅनिटायझरचा वापर केला जात नव्हता.

कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया

१) गेल्या तीन दिवसांपासून आमच्या परिसरात वादळ, वारा व पाऊस सुरू आहे. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला आहे. पिकांचे नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे करावेत व शासकीय मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी व कृषी विभागात अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आलो होतो.

- रामचंद्र धनजी पाटील, गटप्रमुख, भाजप, वडली

२) काही दिवसांपूर्वी वडिलांचे निधन झाले आहे. त्यांचा मृत्यूचा दाखला घेण्यासाठी महानगरपालिकेत आलो होतो. ३० ते ४० मिनिटांचे काम आहे. ते झाले की दवाखान्यात जाणार आहे. कोरोनामुळे तोंडाला मास्क व सॅनिटायझर याचा वापर नियमित करतो.

- तानाजी हिंमतराव पाटील, जळगाव

३) जिल्हा परिषदेमार्फत पिको फॉल, शिलाई मशीन तसेच समाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती व अर्ज घेण्यासाठी आलो होतो. त्याशिवाय ग्रामपंचायत विभागातही काम असल्याने यावे लागले. सरकारी कामे आटोपल्यानंतर बाजार करून घरी जाणार आहे.

- प्रवीण पाटील, वसंतवाडी.

१) जिल्हाधिकारी कार्यालय (फोटो)

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेत दुपारी बारा वाजता भेट दिली असता, या कार्यालयात १२ कर्मचारी आपापल्या जागेवर काम करत होते तर बाहेरून तीनजण कामानिमित्ताने आलेले होते. महसूल शाखेत एकूण १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. बुधवारी ८९ टक्के उपस्थिती दिसून आली. याच शाखेत काही कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे या शाखेचे नायब तहसीलदार पंकज लोखंडे यांनी सांगितले.

२) महानगरपालिका

महानगरपालिकेच्या १७ मजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील घरपट्टी विभागात दुपारी एक वाजता सात कर्मचारी जागेवर दिसून आले. एक शिपाईही आपल्या कामात होता. या विभागात अकरा कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. प्रभाग अधिकारी विलास सोनवणे यांचे दालन मात्र बंद होते. मार्च एण्डमुळे आमच्या विभागात शंभर टक्के उपस्थिती असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

३ जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतील अर्थ विभागात एकूण टेबलपैकी निम्म्याच टेबलवर कर्मचारी काम करत होते. विभाग प्रमुख त्यांच्या दालनात होते तर दालनाच्या बाहेर शिपाई व अन्य कर्मचारी बसलेले होते. एकूणच या विभागात ६५ टक्के उपस्थिती दिसून आली. काही कर्मचारी जेवणाला गेल्याचे सांगण्यात आले. मार्च एण्डमुळे या विभागात धावपळ सुरू होती.

अशी आहे आकडेवारी

कोरोनाचे एकूण रुग्ण : ७८,४७०

बरे झालेले एकूण रुग्ण : ६७,०९६

एकूण झालेले मृत्यू : १,५०१

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : ९,८७३

Web Title: 50% employee attendance in name only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.