स्वेच्छानिवृत्तीसाठी ५० कर्मचाऱ्यांनी भरले अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:39+5:302021-07-05T04:12:39+5:30
जळगाव : राज्य परिवहन महामंडळाने वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी `स्वेच्छानिवृत्ती`ची योजना आणली असून, या योजनेसाठी महामंडळाच्या जळगाव ...
जळगाव : राज्य परिवहन महामंडळाने वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी `स्वेच्छानिवृत्ती`ची योजना आणली असून, या योजनेसाठी महामंडळाच्या जळगाव विभागातून ५० कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. कर्मचाऱ्यांचे हे अर्ज जळगाव विभागातर्फे महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती महामंडळ प्रशासनातर्फे देण्यात आली.
राज्य परिवहन महामंडळाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार सध्या ५० वय ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेताना मूळ वेतन व महागाई भत्ता दिला जाणार आहे. तसेच प्रत्येक वर्षासाठी १२ ऐवजी तीन महिन्यांचे वेतन दिले जाणार असून, नियमानुसार स्वेच्छानिवृत्तीचे लाभही देण्यात येणार आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांना मोफत कौटुंबिक पासची योजनाही लागू राहणार आहे. या सर्व अटी-शर्ती ज्या कर्मचाऱ्यांना मंजूर आहेत, अशा कर्मचाऱ्यांकडून महामंडळातर्फे स्वेच्छानिवृत्तीचे संमतीपत्र भरून घेण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव आगारातील आतापर्यंत ५० कर्मचाऱ्यांनी हे संमतीपत्र भरून, स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान, सध्या महामंडळात विविध विभागांमध्ये ५० वर्षांवरील दीड हजारांहून अधिक कर्मचारी असताना, बोटावर मोजण्याइतक्याच कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज भरल्यामुळे या योजनेकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
इन्फो :
ज्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले होते, त्या कर्मचाऱ्यांचे अर्ज महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. तर मध्यवर्ती कार्यालयाकडूनही मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र, त्यावर अद्याप शासनाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.
- प्रशांत महाजन, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी, एसटी महामंडळ