५० लाखाची बेनामी ठेव प्रकरण : सुनील सूर्यवंशी व किरण पाटील यांचे एकमेकांकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:13 PM2019-06-21T13:13:30+5:302019-06-21T13:13:59+5:30

दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

50 lakhs of Anonymous deposit case: Sunil Suryavanshi and Kiran Patil together with finger | ५० लाखाची बेनामी ठेव प्रकरण : सुनील सूर्यवंशी व किरण पाटील यांचे एकमेकांकडे बोट

५० लाखाची बेनामी ठेव प्रकरण : सुनील सूर्यवंशी व किरण पाटील यांचे एकमेकांकडे बोट

Next

जळगाव : ग.स.सोसायटीत विभागीय अधिकारी किरण भिमराव पाटील यांच्या नावाने ठेवलेल्या बेनामी ५० लाख रुपयांच्या संपत्तीप्रकरणात अटक केलेले संस्थेचे तत्कालीन चेअरमन सुनील अभिमन सूर्यवंशी व किरण पाटील हे दोघं एकमेकांकडे बोट दाखवत असून तपासात उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक तथा तपासाधिकारी जी.एम.ठाकूर यांनी गुरुवारी न्यायालयात दिली. दरम्यान, सूर्यवंशी व पाटील या दोघांना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
ग.स.तील बेनामी ठेव प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन बुधवारी सूर्यवंशी व पाटील या दोघांविरुध्द जळगाव शहर पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक (सुधारीत) अधिनियम सन २०१८ चे कलम १३ (१) (१) सह १२ व भादवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर दोघांना गुरुवारी न्या.डी.ए.देशपांडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, पोलिसांकडून कागदपत्रे येताच सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात येणार आहे.
अपहार प्रकरणातही अमळनेर न्यायालयात दोषारोपपत्र
सूर्यवंशी व त्यांच्या साथीदारांनी जिल्हा बॅँकेच्या चोपडा शाखेत बनावट दस्ताऐवज तयार करुन बनावट खाते उघडले व तेथे अपहार केल्याने त्यांच्याविरुध्द सीबीआयने चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अमळनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे ठाकूर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, दोघांच्या घरझडतीत काहीच आढळून आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
युक्तीवादात आरोपींमध्येच जुगलबंदी
अटकेतील दोघं संशयितांना न्यायालयात हजर केल्यानंतर सूर्यवंशी यांचे वकील सागर चित्रे यांनी यांनी या प्रकरणात आधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केलेली आहे. आता केवळ राजकीय द्वेषापोटी हा गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय सूर्यवंशी यांनी २०१७ मध्ये संचालकपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीची गरजच नसल्याने न्यायालयाला सांगितले.
किरण पाटील यांची वकील प्रकाश पाटील यांनी ५० लाखाची ठेव ठेवताना व खाते उघडतानाची सही किरण पाटील यांची नाही. याआधीच्या चौकशीत तसा जबाबही दिलेला आहे. त्याशिवाय दोन कर्मचाऱ्यांनीही जबाब दिलेला असून तुम्ही किरण पाटील यांच्या नावाने ठेव ठेवू नका व त्यांची सही देखील करु नका असेही या कर्मचाऱ्यांनी सूर्यवंशींना सांगितले होते व तसा जबाबही त्यांनी दिलेला आहे. हा व्यवहार सूर्यवंशींनीच केल्याचे या कर्मचाºयांनी जबाबात म्हटले आहे.किरण पाटील यांचा या गुन्ह्याशी संबंधच नाही. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीची गरजच नसल्याचा युक्तीवाद अ‍ॅड.पाटील यांनी केला.
जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झालेला आहे. ५० लाखाची रक्कम मोठी आहे. हस्ताक्षर नेमके कोणाचे आहे. या तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे अ‍ॅड.ढाके यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने दोघं संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: 50 lakhs of Anonymous deposit case: Sunil Suryavanshi and Kiran Patil together with finger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव