जळगावच्या विद्यापीठाकडून ६७ अभ्यासक्रमांचे ५० टक्के शुल्क माफ!
By अमित महाबळ | Published: August 24, 2023 07:36 PM2023-08-24T19:36:36+5:302023-08-24T19:37:23+5:30
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली
अमित महाबळ
जळगाव : विद्यापीठाने एम.के.सी.एल. सोबत सामंजस्य करार केलेला असून, त्याअंतर्गत विशारद स्कील डेव्हलपमेंट माध्यमातून महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळांमधील विद्यार्थ्यांना क्लिक कोर्सेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातील सर्व कोर्सेससाठी आकारल्या जाणाऱ्या एकूण शुल्कातील विद्यापीठाला मिळणाऱ्या शुल्कापैकी ५० टक्के शुल्काला ‘कुलगुरू कौशल्य विकास शिष्यवृत्ती’म्हणून सूट देण्याचा विद्यार्थी हिताचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांना मान्यता देण्यात आली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत एम.के.सी.एल. सोबत विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे ६० तासांचे २ क्रेडीटचे आणि १२० तासांचे ४ क्रेडीटचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. एकूण ६७ कोर्सेस यामध्ये उपलब्ध आहेत.
हे आहेत अभ्यासक्रम
अकाऊंटींग करीअर, बँक ऑफिस करीअर, डिझायनिंग, डिजीटल आर्ट्स, डिजीटल फ्री लान्स तसेच हार्डवेअर व नेटवर्क मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आदी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यातील काही कोर्सेसचे शुल्क ५००० रुपये आहे, तर काहींचे २५०० रुपये शुल्क आहे.
ही अट पूर्ण करा, मगच मिळेल सवलत
अभ्यासक्रमाच्या शुल्कापैकी एम.के.सी.एल.ला दिले जाणारे शुल्क वगळता विद्यापीठाला प्राप्त होणाऱ्या शुल्कातून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘कुलगुरू कौशल्य विकास शिष्यवृत्ती’ म्हणून ५० टक्के शुल्क सूट देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेतला.