निर्बंधांच्या काळात दस्त नोंदणीत ५० टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:17 AM2021-05-07T04:17:20+5:302021-05-07T04:17:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने एप्रिल महिन्यापासून कडक निर्बंध लागु केले आहेत. याकाळात शासनाला दस्त नोंदणीतून मिळणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य शासनाने एप्रिल महिन्यापासून कडक निर्बंध लागु केले आहेत. याकाळात शासनाला दस्त नोंदणीतून मिळणाऱ्या महसुलात ५० टक्के कमी झाला आहे. जानेवारी पासून दर महिन्याला जिल्हाभरात मालमत्ता खरेदी विक्रीच्या ९ हजारापेक्षा जास्त दस्त नोंदणी होत होती. मात्र फक्त ५ हजार २०५ दस्त नोंदणी झाली आहे. त्यातून शासनाला १० कोटी ७० लाख ८५ हजार ८९० रुपयांचा महसुल मिळाला आहे.
मार्च महिन्यात ९८६२ दस्त नोंदणी करण्यात आली होती. त्यातून सुमारे १७ कोटींचा महसुल मिळाला होता. जानेवारी ९१४६ एवढी दस्त नोंदणी होती. तर १८.२६ कोटींचा महसुल मिळाला होता. फेब्रुवारीत दस्त नोंदणी ९५०५ होती तर १५.६९ कोटींचा महसुल मिळाला होता.
एप्रिल महिन्यात जिल्हाभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता. त्यामुळे मुद्रांक विभागाशी संबधिंत सर्व कामांना हजर रहायचे असेल तर आधी नोंदणी करून मगच यावे लागत होते. तसेच ४८ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगावा लागत होता. त्यामुळे या महिन्यात दस्त नोंदणीचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. परिणामी महसुल देखील कमी झाला आहे.