५० वर्षांत अनेक अंध विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत मिळविला नावलौकिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:46+5:302021-06-10T04:12:46+5:30
चाळीसगाव : राष्ट्रीय अंध शाळेने गेल्या ५० वर्षांत हजारो अंध विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्यामुळे या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत नावलौकिक ...
चाळीसगाव : राष्ट्रीय अंध शाळेने गेल्या ५० वर्षांत हजारो अंध विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्यामुळे या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविला आहे. या अंध विद्यार्थ्यांमध्ये खऱ्या अर्थाने जगण्याच्या उमेदीने त्यांना नवी प्रेरणा, आत्मविश्वास, बळ मिळावे या उद्देशाने संचालकांसह मुख्याध्यापक, शिक्षक सतत धडपडत आहेत. जन्मतःच आलेले अंधत्व, घरातील हलाखीच्या आर्थिक परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरादार अंध विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत यश मिळविले आहे.
१० जून हा ‘जागतिक दृष्टीदान दिन’ म्हणून साजरा केला जातो. चाळीसगावच्या राष्ट्रीय अंध शाळेची स्थापना १ जुलै १९७० रोजी अंध असलेल्या उमेदराव रतन चव्हाण या दृष्टीहीन व्यक्तीने शिक्षणमहर्षी य. ना. चव्हाण, ॲड. हिरालाल चव्हाण, दवे, काकडे आदींच्या सहकार्यातून झाली. सुरुवातीला दोन ते तीन विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या या अंध शाळेने पुढे हळूहळू विद्यार्थी व शिक्षक यांच्या संख्येत वाढ होऊन गुणात्मकरीत्या शाळेचा विकास होत गेला. नंतर शासकीय अनुदानही प्राप्त झाले.
शाळेच्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत आतापर्यंत सुमारे पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांनी या शाळेत शिक्षण घेतले. सद्य:स्थितीत ६० विद्यार्थी शिक्षण घेत असून, शिक्षकांसह कर्मचाऱ्यांची संख्या २० आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळ प्रकारांमध्ये पदके मिळविली आहेत. विशेषतः क्रिकेटच्या खेळात या विद्यार्थ्यांना अधिक रुची असून, त्यांनी विविध स्तरावर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. शाळेतून शिकून आपापला व्यवसाय, उद्योगाला लागले. त्यापैकी प्राध्यापक, शिक्षक, टेलिफोन ऑपरेटर, मंत्रालय, आयुक्तालय, बँकेत, शासकीय, निमशासकीय कार्यालये याठिकाणी विद्यार्थी मानाची पदे भूषवीत आहेत.
या अंध शाळेतील अंध विद्यार्थ्यांना शाळेतील मुख्याध्यापिका प्रभा महादेव मिश्राम, कर्मचारी व शिक्षक भरभरून प्रेम व माया देतात आणि काळजी घेतात. मातीच्या गोळ्याला सुबक आकार देण्याचे काम शाळेचे उत्तम शिल्पकार असलेले शिक्षक करतात.