यावल तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 06:01 PM2019-05-19T18:01:51+5:302019-05-19T18:05:39+5:30
यावल तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे गेल्या दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे झाली. यातून लाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
डी.बी.पाटील
यावल, जि.जळगाव : तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे गेल्या दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे झाली. यातून लाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात तालुक्यात जलपातळी खोल जात असल्याने शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने अनेकांना पाणी अडवा-पाणी जिरवा योजनेसह वृक्ष लागवडीची आठवण होते. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा पुढील उन्हाळ्यापर्यंत त्यावर कोणीही बोलत नसल्याची गेल्या अनेक उदाहरणे आहेत. मात्र तालुक्यातील सांगवी येथील ग्रामस्थांनी गेल्या वर्षापासून नदी पात्रात जलबंधारे आणि लाखो लीटर्स पाणी जिरविण्यासाठी सुरू केलेली योजना या वर्षातही सुरू ठेवली असून, गेल्या वर्षी ४० तर या वर्षात सात अशी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून केली असल्याने तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. त्या पाठोपाठ आता तालुक्यात अनेक गावात या योजना सूर झाल्या आहेत.
यावल-फैजपूर रस्त्यावरील सांगवी बुद्रूक येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने गेल्या वर्षी नदी परिसरात ४० जलसंधारणाची कामे केली. यात प्रामुख्याने माती बंधारे लाखो लीटर्स पाणी मावेल असे मोठमोठे तलाव सदृष्य खड्डे तयार करणे यासारखी कामे केली होती. त्याचा फायदा या गावासाठी निश्चितच झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. तालुक्यात अनेक गावांना यावर्षी पाणीटंचाई उद्भवली. मात्र सांगवीमध्ये पाणीटंचाई नाही. गावचे सांडपाणीसुद्धा नदी पात्रातील खड्ड्यामधून जिरविले जात आहे.
गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षातही ग्रामस्थांनी लोकसहभागतून मागील वर्षाचे सहा खड्डे पुनरुज्जीवित करून नव्याने १०० बाय ५० बाय १२ फूट ज्यात १७ लाख १७ हजार लीटर्स पाणी मावेल, तर दुसरा २३१ बाय २७ बाय १२ फुटांच्या खोलीचा ज्यात ३२ लाख ७० हजार लीटर्स पाणी मावेल, आणि तिसरा ११२ बाय २७ बाय १० फूट खोलीचा आठ लाख ७० हजार लीटर खोलीचे तलाव सदृष्य खड्डे केले आहेत.
मागील वर्षाचे आणि या वर्षाचे मिळून ग्रामस्थांनी परिसरात ५० जलसंधारणाची कामे केली. त्यासाठी ग्रामस्थांनी मागील वर्षी सुमारे सात लाखांचा निधी जमा केला होता. त्यातील पाच लाख जलसंधारणावर खर्च केले तर एक लाख रुपये वृक्ष लागवडीवर खर्च केले.
१०० टक्के वृक्ष संगोपन
शासकीय यंत्रणेव्दारा दरवर्षी लाखो वृक्ष लागवड होते आणि दुसऱ्या वर्षी परत त्याच खड्ड्यातून वृक्ष लागवड होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र सांगवीकरांनी गेल्या वर्षी गावात केवळ १२६ वक्ष लावले.
वृक्ष लागवड करताना एक हजार रुपये, दीड हजार रुपये किमतीची मोठी झाडे आणून त्यांचे संगोपन केल्याने १०० टक्के वृक्ष लागवड यशस्वी झाल्याचे तलाठी एस.के.पाटील यांनी सांगितले. या योजनेसाठी गावातील अमोध कोळंबे, अतुल उल्हास चौधरी, दीपक चौधरी, पी. एम. भंगाळे, दीपक भंगाळे, योगेश भंगाळे, विकास भंगाळे, भालचंद भंगाळे यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले असल्याचे तलाठी पाटील यांनी सांगितले.